Talegaon Dabhade : सक्षम समाज घडवणे हाच भागवत धर्माचा गाभा- डॉ. अभय टिळक

एमपीसी न्यूज- भक्तीला अस्तर नितीचे असावे. जो भक्तीवान असेल तो नितीवानच असतो. नैतिकतेने जीवनात जगले पाहिजे. नितीचे अधिष्ठान हरवत चालले आहे. म्हणून मूळ तत्त्वाचे जागरण करणे हीच भागवत धर्माची चळवळ आहे. परमार्थ करायचा तर संसार करू नका, तर वैराग्य धारण करा तोच सर्वोत्तम बिंदू आहे असे प्रतिपादन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे अध्यक्ष डाॅ अभय टिळक यांनी केले.

समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प संत ज्ञानेश्वर या विषयावर गुंफताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा साहेबराव काशिद, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे अध्यक्ष डाॅ अभय टिळक, डाॅ अनंत परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे, नितीनमहाराज काकडे, नगरसेवक अॅड श्रीराम कुबेर, संस्थापक संतोषशेठ खांडगे, उपाध्यक्ष कैलास काळे, रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष शंकर हादिमणी, आदी उपस्थित होते.

डाॅ टिळक म्हणाले, ” व्यासांनी गीता ग्रंथ लिहिला. बोध सांगितला तो व्यासांनी, गीता ही तत्कालीन समाजव्यवस्थेत ज्ञानाचा अधिकार नाकारला त्यांच्यासाठी आहे. ज्ञाना इतकी पवित्र गोष्ट कोणतीच नाही. वंचितांचे सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी व्यासांनी इहवादी अर्थात सर्वधर्मसमभाव भूमिका मांडली. गीता हे जीवन उपयोगी ज्ञान आहे. ज्यांना गरज आहे त्यासाठी मराठी भाषेच्या पाय-या तयार केल्या आहेत. विठ्ठलाचा अवतार हाच ज्ञानोबारायांचा अवतार आहे. भागवत धर्माचे अधिष्ठान पांडुरंग आहे. पांडुरंग आला कुठून, ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो गोकुळातून आला. ज्ञानेश्वरी लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करताना माऊली म्हणतात जीवाला आनंद साम्राज्याचे सम्राट करण्याचे सामर्थ्य ब्रम्हविद्येत आहे; पण ही ब्रम्हविद्या संस्कृतभाषेमुळे सामान्यांपासून दुरावली या ब्रम्हरसाचा अमृताचा आस्वाद सामान्य जणांना घडविल्याशिवाय तत्त्वबोधाचे प्रबोधन कसे होणार? त्यासाठी त्यांना समजणारी भाषा आणि पेलणारे तत्त्व सांगणे गरजेचे आहे त्यासाठी माझे गुरू श्री निवृत्तीनाथ यांनी श्रीगीताचिदगंगेच्या काठावरचे संस्कृत भाषेचे दाट अरण्य तोडून कोणालाही या गंगेत स्नान करता येईल, असा ज्ञानेश्वरीरूपी घाट बांधला आणि लोकांना समजेल अशा स्पष्ट रीतीने संस्कृतातील गीतार्थ मराठीत आणला”

“जीवन उच्च पातळीवर न्यायचे असेल तर वैराग्य आवश्यक आहे. हेतुपूर्वक केलेले काम भगवंताला अर्पण करावे. प्रपंच करून वैराग्य मिळत नाही. तर उत्तम पद्धतीने व्यवहार करून जो आसक्ती न ठेवता परोपकार करतो, कोणाची निंदा करीत नाही, सर्व भूतांवर दया करतो, गायी वगैरे पशूंचे पालन करतो यथाशक्ती विहिरी आड वगैरे निर्माण करतो, आपली वृत्ती शांत ठेवून कोणाशी वाईटपणे वागत नाही व श्रेष्ठ लोकांचा मान ठेवतो त्याचाच गृहस्थाश्रम आदर्श होय आणि मोक्ष प्राप्तीला जे वैराग्य लागते ते हेच होय” असेही डॉ. टिळक म्हणाले.

“विचारांचे जागरण घडविणे, समाजाचे सक्षमीकरण करणे, आपल्या वाट्याला आलेले कोणतंही काम प्रामाणिकपणे करणे आणि माझा उध्दार न होता समाजाचा उद्धार व्हावा हाच हेतू ठेवणे हा भागवत धर्माचा गाभा आहे. समाज ही लोकसंस्था आहे. ही रक्षणीय आहे. जो ज्ञानी आहे अशा व्यक्तीने समाज जडणघडणीसाठी कार्य केले पाहिजे. पाण्याचा गुणधर्म काय की पाटाचे पाणी आपला मार्गसोडून पहिला खड्डा भरते तसं समाजात जी न्यूनता आहे ती आपल्या परीने भरावी ही जगण्याची रित आहे. ती जपली पाहिजे. ज्ञानच सक्षमीकरणाचे मूळ साधन आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा पाया रचला” असे डॉ. टिळक म्हणाले.

बाळासाहेब काशिद म्हणाले, “वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्रचे अधिष्ठान असून संताच्या विचारांची गरज आहे.संताचे विचार आज समाजासाठी तारक आहेत. श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीचे काम चालु असून आपण सर्वांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन ही काशिद यांनी केले”

प्रमुख पाहुणे कलापिनी सांस्कृतिक भवनचे मुख्य विश्वस्त डाॅ अनंत परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रो. शंकर हादिमणी यांनी केले. संस्थेचा हेतू व उद्देश विषद करून संस्थेच्या सामाजिक कार्याविषयीची माहिती हादिमणी यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाने झाली. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर व श्रीमती कुसुम वाळुंज यांनी केले. आभार प्रकल्प प्रमुख सुमती निलवे यांनी मानले.

यावेळी रजनीगंधा खांडगे, प्रा दीपक बिचे, सुचेता बिचे,रत्नकांत चिखले, राजन बोत्रे गुरूजी तसेच तळेगावकर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.