Talegaon Dabhade : सुयोग्य बोलण्यानेच परब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकतो – माऊली महाराज कदम

एमपीसी न्यूज- सुयोग्य बोलण्यानेच निर्गुण परमेश्वर सगुण रुपात प्राप्त होतो म्हणजेच परब्रह्माचा साक्षात्कार होतो. प्रसन्न बोलण्याने लक्ष्मी, पैसा, संपत्ती, प्राप्त होते. गोड बोलण्याने मित्र-सखे प्राप्त होतात. सुयोग्य बोलण्याने गौरव प्राप्त होतो. त्यामुळे माणसाने योग्य प्रकारे संवाद साधावा, असे प्रतिपादन नामवंत कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर तथा माऊली महाराज कदम यांनी केले.

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघ व ‘श्री विठ्ठल परिवार, मावळ’ यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात माऊली महाराज कदम यांचे कीर्तन झाले. त्यात त्यांनी कीर्तनरुपी सेवेसाठी संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या गाथेतील ‘नाम साराचे हे सार । शरणागत यम किंकर ।। उत्तमात्तम । वाचे बोला पुरुषोत्तम ।। नाम जपे चंद्रमौळी । नामेतरला वाल्याकोळी ।। तुका म्हणे वर्णू काय । तारक विठोबाचे पाय ।।’ हा अभंग निवडला होता. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. अखंड हरीनाम सप्ताहाचे मुख्य संयोजक व तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

माऊली महाराज म्हणाले की, या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की नाम साधन हे तारक असून त्याचा आग्रह मृत्यूलोकात सर्वांनी धरला पाहिजे. कारण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, मानवी जीवनावर संवादाचे प्रभुत्व आहे, असा कोणी नाही जो संवाद करत नाही, जरी मौनव्रत धारण केलेला मनुष्य मनाशी संवाद केल्याशिवाय राहत नाही. परंतु संवाद साधताना काय बोलावे कसे बोलावे याचे भान ठेवले पाहिजे या बोलण्यामुळेच खूप फायदे होतात आणि तोटे ही होतात. प्रसन्न बोलण्याने लक्ष्मी, पैसा, संपत्ती, प्राप्त होते. गोड बोलण्याने मित्र सखे प्राप्त होतात. सुयोग्य बोलण्याने गौरव प्राप्त होतो. आणि बोलण्यानेच परमेश्वर देखील आकळता येतो. निर्गुण परमात्मा सगुण रूपामध्ये प्राप्त होतो, परब्रम्हाचा साक्षात्कार होतो. परंतु अति बोलण्याने विनाकारण वैर वाढते, वाईट बोलण्याने समोरच्याचे हृदय देखील तुटू शकते, आणि अतिबोलण्याने परमात्मा दुरावला जातो. त्यामुळे बोलताना सुयोग्य बोलल्यास त्या बोलण्याने, त्या नामचिंतनाने भगवान परमात्मा आपलासा होतो.

बोलताना मुखाने देवाचे नाम बोला. अशा बोलण्याने यमदूत देखील शरणागत होतात, असे माऊली महाराजांनी सांगितले. सर्व काही यमाचे ग्रास होतात. परंतु देवाचे नाम तसेच संतांचे नाम त्याला कधीच बाधू शकत नाही. नाम हे उत्तम आहे, ब्रम्हज्ञानाने ब्रम्ह कळतो पण नामाने मनुष्य स्वतः ब्रम्ह होतो. ब्रम्हज्ञान हे सार आहेच परंतु या साराचे ही सार विठ्ठलाचे नाम आहे, असे ते म्हणाले.

माऊली महाराजांनी कीर्तनाचे निरूपण करण्याआधी परिहार देताना या सोहळ्याचे मुख्य संयोजक सुनील शेळके यांना विशेष धन्यवाद दिले. या कार्यक्रमाचे नियोजन खूप सुंदर असून त्यासाठी शेळके यांना द्यावेत तितके धन्यवाद कमीच आहे. सुनील शेळको हे वारकऱ्यांचे कुबेर असून हा ज्ञानयज्ञ, ज्ञानदान ही संपत्ती अण्णांनी सर्व वारकऱ्यांना प्रदान केली आहे. या मोठ्या भव्य दिव्य सप्ताहाची आखणी व नियोजनाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.