Talegaon Dabhade : जेवणाचे पार्सल मागितले म्हणून वेटरने लगावली महिलेच्या कानशिलात

एमपीसी न्यूज – वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासोबत हॉटेलमध्ये आलेल्या महिलेला जेवण करण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे महिलेने जेवण पार्सल करून देण्यास सांगितले. यावरून चिडलेल्या वेटरने महिलेशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या आईच्या कानशिलात लगावली. ही घटना तळेगाव दाभाडे येथील हॉटेल बगीचा येथे शनिवारी (दि. 19) घडली.

पीडित महिलेने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वेटर किरण पाटील आणि अन्य तीन वेटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 19 जानेवारी) फिर्यादी महिला त्यांच्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील हॉटेल बगीचा येथे आपल्या आई, वडील, भाऊ यांच्यासोबत गेल्या होत्या. यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. वाढदिवस साजरा करण्याच्या नादामध्ये त्यांना जेवण करण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांनी हॉटेल मधील वेटरला जेवण पार्सल करून देण्यास सांगितले.

त्यावरून झालेल्या वादावादीनंतर चिडलेल्या वेटरने ‘आत्ता रात्रीचे बारा वाजले आहेत. आम्ही कोणाच्या बापाचे ऐकणार नाही’ असे म्हणून फिर्यादी महिलेच्या आईच्या कानशिलात लगावली. फिर्यादी महिलेने वेटरला याबाबत विचारणा करत असताना सर्व वेटरनी मिळून फिर्यादी महिलेला शिवीगाळ व दमदाटी करत असभ्य वर्तन करून विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.