Talegaon Dabhade : एल अॅण्ड टी कंपनीतील 9 स्थानिक कायम कामगारांचे तडकाफडकी निलंबन

कामगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा

0 2,025

एमपीसी न्यूज- तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील एल अॅण्ड टी कंपनीतील 9 कायम कामगारांचे कंपनी व्यवस्थापनाने कसलीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी निलंबन केल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तातडीने या कामगारांना पुन्हा कामावर रुजु करुन न घेतल्यास कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा निलंबित कामगार आणि शिवक्रांती कामगार संघटना व स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

HB_POST_INPOST_R_A

दहा बारा वर्षापूर्वी तळेगाव एमआयडीसी येथे एल अॅण्ड टी कंपनी सुरु करण्यात आली. याठिकाणी संरक्षण विभागाशी संबंधित वस्तुंचे उत्पादन केले जाते. जवळपास २५० कामगार येथे काम करतात, यापैकी 125 डिप्लोमाधारक युवक आठ ते दहा वर्षापासून काम करत आहेत. ते सेवेत कायम असताना देखील त्यांना या आठ वर्षात कसलीही पगारवाढ कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आलेली नाही.

काही जणांच्या जागा या प्रकल्पासाठी बाधित झालेल्या आहेत, असे असताना त्यांना मानसिक त्रास देऊन कामावरुन कमी करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक सुरु केला आहे. कायम सेवेत असलेल्या 125 जणांनी नुकतीच कामगार संघटना स्थापन केली आहे. तर त्याच धर्तीवर कंत्राटी कामगार सुद्धा संघटना स्थापन करण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर दबाव म्हणून नऊ कायम कामगारांचे निलंबन करण्यात आले आहे. कंत्राटी कामावरील जवळपास शंभर जणांना कामावरुन कमी करण्यात आले असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे.

संरक्षण विभागाशी संबंधित उत्पादन याठिकाणी घेतले जात असल्याने कामगार व शिवक्रांती कामगार संघटना यांनी शांततेच्या मार्गाने ही समस्या सोडविण्याकरिता कंपनी व्यवस्थापनाकडे अनेकवेळा चर्चेचा प्रस्ताव पाठविला मात्र त्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेत चर्चा करणे टाळले आहे. याबाबत संरक्षण र‍ाज्यमंत्री सुभाष भामरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मावळचे आमदार बाळा भेगडे, सुनील शेळके, बापुसाहेब भेगडे, किशोर भेगडे यांच्याशी चर्चा करुन योग्य तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

मात्र कंपनी व्यवस्थापन प्रतिसाद देत नसल्याने स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याकरिता मावळातील सर्व राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करुन कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सर्वसमावेशक आंदोलन करण्याचा इशारा शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड. विजय पाळेकर यांनी दिला आहे. या आंदोलनाला कंपनीचे कायम कामगार संप पुकारुन साथ देणार आहेत.

बाहेरुन येणार्‍या नवख्या कामगारांना जास्त पगार व वर्षानुवर्ष काम करणार्‍या स्थानिक कामगारांना अल्प पगार तसेच पगारवाढ नाही हा स्थानिकांवर अन्याय असल्याने या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता सदरचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी निलंबित कामगार नवनाथ गायकवाड, महेंद्र शिंदे, प्रसाद कुटे, नितिन कोकाटे, महेश बिराजदार, अजिंक्य जमदाडे, शैलेष धुमाळ, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस विजय पाळेकर, गुलाबराव मराठे, रवींद्र साठे, रोहन आहेर हे उपस्थित होते.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: