Talegaon Dabhade : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रास्ता रोको

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी हे युवा आक्रोश आंदोलन करण्यात आले. दरम्यान, उर्से टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, तळेगावचे नगरसेवक किशोर भेगडे, मावळ तालुका ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते, पुणे जिल्हा समन्वयक राकेश कामठे, पुणे शहर युवक अध्यक्ष महेश हंडे, पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, मावळ तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, देहूरोड शहर युवक अध्यक्ष सचिन भुंबक, तळेगाव शहर युवक अध्यक्ष आशिष खांडगे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, प्रदेश सरचिटणीस अजय आवटी, मावळ तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, नगरसेवक संतोष भेगडे, जिल्हा युवक सरचिटणीस विशाल वहिले, मावळ तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अफताब सय्यद सर्व तालुक्यातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मागील पाच वर्षात अनेक निर्णय घेतले. हे सर्व निर्णय युवकांच्या अहिताचे होते. या निर्णयामुळे अनेक कंपन्यांनी आपले बस्तान हलवले आहे. पोलीस भरती आणि एमपीएससी परीक्षेत केलेले बदल यामुळे स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या व्यापम घोटाळ्यातील संस्थेला महाराष्ट्र सरकार पायघड्या घालत आहे. अभियंते सध्या सात ते दहा हजार रुपयांमध्ये काम करत आहेत, ही सर्व परिस्थिती राज्य शासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे आली आहे.

शासनाने पुणे-मुंबई दरम्यान द्रुतगती मार्गावरून हायपरलूप तयार करण्याचा घाट घातला आहे. हे प्रकरण सध्या वरच्या पातळीवर असले तरी याचे मावळ मधील स्थानिक शेतक-यांच्या जमिनीच्या कागदपत्रांवर शिक्के मारण्यात आले आहेत. शेतक-यांना विश्वासात न घेता हे धोरण अवलंबिले जात आहे. यासाठी शेतक-यांचा विरोध आहे. शासनाने याबाबत कोणतीही जनजागृती केली नाही. पिंपरी-चिंचवड मधील भाजपचे पदाधिकारी पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे शहरासाठी पाणी आणू अशी भाषा करतात. तर दुसरीकडे मावळ मधील भाजपचे नेते पवना बंदिस्त जलवाहिनीवरून राजकारण करत आहेत. बंद जलवाहिनी आम्ही होऊ देणार नाही, अशी भाषा करत आहेत. ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी केला.

महाराष्ट्र शासनाने तयार केलेले महापरीक्षा पोर्टल रद्द करा, जुन्या कायद्याप्रमाणे पोलीस भरती करा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. या मागण्या येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. सुमारे दीड तास आंदोलकांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखून धरला. पोलिसांनी 100 ते 150 कार्यकर्त्यांची धरपकड केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.