Pimpri : गणेशोत्सवासाठी वल्लभनगर आगारातून एसटीच्या 40 जादा बसेस

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी वल्लभनगर आगाराकडून विविध मार्गावर 40 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत दरम्यान बसचे नियोजन करण्यात आले आहे.

भोर- वरंध घाट वाहतुकीसाठी बंद असल्याने इतर मार्गाने वाहतूक वळवावी लागत आहे. तर, ताम्हिणी घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने वाहनांचे पाटे खराब होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. वल्लभनगर आगारातून 30 ऑगस्टपासून 40 अतिरिक्‍त एसटी सोडण्यात येणार आहेत. तसेच, 9 सप्टेंबरपासून परतीच्या मार्गाची सोय करण्यात आली आहे.

त्यासाठी ग्रुप आरक्षण सुरु करण्यात आले आहे. चिपळूण येथे दोन बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे दापोली, देवरुख, गुहागर, खेड, महाड, तिवरे, रत्नागिरी, महाड येथे एसटीच्या अतिरिक्‍त फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त 52 फेऱ्या करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा महिनाच्या सुरवातीलाच आलेला गणेशोत्सव आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे एसटीच्या उत्पन्नाला फटका बसणार आहे.

त्याचप्रमाणे परतीच्या मार्गावरही एसटीने सोय केली आहे. 9 ते 12 सप्टेंबरपर्यंत परतीच्या फेऱ्या असणार आहेत. सध्या मार्ग बंद असल्याने भोर, महाड, केळशी, दापोली या मार्गावरील चार बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. गळपतीपुळे मार्गावरील बस बंद आहे. तेथे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, काही मार्गात बदल करण्यात आल्यामुळे या वेळी तिकीटामध्ये किचिंत वाढ होण्याची शक्‍यता एसटी प्रशासनाने व्यक्‍त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.