Talegaon Dabhade News : नगरपरिषदेच्या लेखी आश्वासनानंतर बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विद्युत विभाग, अग्निशमन विभाग, आस्थापना विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जनसेवा विकास समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते.

नगर परिषदेच्या विद्युत विभाग, अग्निशमन विभाग, आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांना मासिक पगार वेळेवर मिळत नसून मिळणारा पगार नियमानुसार मिळत नसल्याने कंत्राटी कामगारांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना सदर प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

जनसेवा विकास समिती गेल्या तीन महिन्यापासून कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे.

जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटी कामगारांना घेऊन नगरपरिषद प्रशासनास मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याबाबत लेखी निवेदन दिले.

संध्याकाळी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित करून त्वरित एक महिन्याचा पगार अदा केला. पगारातील फरकाबाबत समिती नेमून चौकशी करण्यात येईल व समितीच्या आदेशानुसार कंत्राटदार पगार देण्यास बांधील राहील असे लेखी हमी पत्र कंत्राटदारांकडून घेण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी यांनी सदर बैठकीत स्पष्ट केले.

आंदोलन कर्त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी संदर्भातील लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे, नगरसेवक समीर खांडगे, संतोष शिंदे, निखिल भगत, गणेश काकडे, मिलिंद अच्युत, रोहित लांघे, कल्पेश भगत व सर्व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी वेळ आली तर आंदोलन करणार असल्याचे किशोर आवारे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.