Talegaon Dabhade : एनसीईआरमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारत-पाकिस्तानसह सात देशातील संशोधकांचा सहभाग

'इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगचे' परिषदेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (एनसीईआर) मध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग (ICCIP-2023)ची पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 9) उद्घाटन झाले. या परिषदेमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, पोलंड, मलेशिया, नायजेरिया, अमेरिका आणि इराक या सात देशातील संशोधकांसह देशातील बहुतांश राज्यातील विद्यार्थी आणि अभियांत्रिकी संशोधकांनी भाग घेतला आहे.

मानवजातीचे जीवन सुसह्य करण्यासाठी तरूण पिढीतील अभियांत्रिकी संशोधकांनी संवाद आणि माहिती प्रक्रिया आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठाचा पूरेपूर उपयोग करावा.शैक्षणिक संशोधक, अभियंते आणि उद्योग जगतातील तज्ज्ञांना त्यांची नवीनतम तांत्रिक कार्यकौशल्ये आणि अभिनव उत्पादनांना सादर करण्यासाठी हे खुले व्यासपीठ संधी देईल, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी शुक्रवारी(9 जून) येथे व्यक्त केले.

पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशनचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर एनसीईआरचे चेअरमन राजेश म्हस्के, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, प्राचार्य डॉ.विलास देवतरे तसेच परिषदेच्या मुख्य संयोजक प्राचार्या डॉ.अपर्णा पांडे व डॉ. दिग्विजय पाटील आदि उपस्थित होते.

उद्योग आणि कौशल्याधारित शिक्षणात अग्रेसर असलेल्या एनसीईआर अभियांत्रिकी महाविद्यालयातील या परिषदेत भारतासह पाकिस्तान,बांगलादेश, पोलंड,मलेशिया,नायजेरिया,अमेरिका आणि इराक या सात देशातील संशोधकांसह देशातील बहुतांश राज्यातील विद्यार्थी आणि अभियांत्रिकी संशोधकांनी भाग घेतला आहे. त्यांचे एकूण 207 शोधनिबंध सादर केले जाणार असल्याची माहिती डॉ.अपर्णा पांडे यांनी प्रास्ताविकात दिली.

RTE : आरटीईच्या 908 जागा रिक्त

प्रमुख पाहुणे रावळ यांनी व्यवसायातील यशाची त्रिसूत्री सांगितली. ते म्हणाले, की संशोधकांनी केवळ एकाच विषयापुरते केंद्रित न होता सर्वसमावेशक अभ्यासातून सतत सुधारित माहिती घेत राहावे. तंत्रज्ञानात झपाट्याने होणा-या बदलांना अनुभवण्यासाठी लवकरात लवकर सुरूवात केली पाहिजे. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना सुकर व सहज वापरता येणा-या उत्पादनांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला रावळ यांनी दिला.

देशातील पहिले कोविड टेस्टिंग किटची निर्मिती केल्याबद्दल 30 कोटींचे सरकारी अनुदान मिळालेल्या मायलॅबचे हसमुख रावळ यांचा पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या अभिनंदनाचा उल्लेख करत माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी संस्थेतर्फे रावळ यांचा विशेष सत्कार केला.

दरम्यान, आयसीसीआयपी 2023 पुस्तिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना उद्यमी करण्यासाठी होत असलेल्या प्रकल्पांची माहिती एनसीईआरचे चेअरमन राजेश म्हस्के यांनी यावेळी दिली. प्रा. उमा पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अर्चना भसे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.