Talegaon Dabhade: नाम हाच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग – प्रा नामदेवराव तळपे

एमपीसी न्यूज – जीव शिवस्वरूपात एकरूप व्हायला नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे म्हणूनच संत नामदेवांनी नाम हा परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग असल्याचं म्हटले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नामदेवराव तळपे यांनी केले.

समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संत नामदेव या विषयावर गुंफताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, साहित्यिक प्रा. दीपक बिचे, संस्थापक संतोष खांडगे, उपाध्यक्ष कैलास काळे, रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष शंकर हादिमणी आदी उपस्थित होते.

  • प्रा. तळपे म्हणाले की, संतानी स्वतः साठी काहीच मागितले नाही. परमेश्वर माणसात आहे. दुसरीकडे शोधण्याची आवश्यकता नाही. नाम हे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे. परमेश्वराचे नाम हे सर्वोत्कृष्ट आहे. विठ्ठल- नामदेव यांची भक्ती वेगळीच होती. भक्ती, प्रेम हे जोडण्याचे काम करते. ‘अमृताहूनी गोड नाम तुझे देवा l मन माझे केशवा का बा न घे ll’

संतश्रेष्ठ नामदेव हे केवळ नामाचे उपासक नाही, तर ते नामाचे प्रबोधक आहेत. नामानेच ज्ञान मिळवावे आणि प्रेम साठवावे अशी नामदेवरायांची धारणा होती. ज्ञान, भक्ती, नीती, कृती, शक्ती, शांती आणि मुक्ती नामाशी जोडली आहे, म्हणून तर नामदेवरायांनी नामाला ‘ नामवेद ‘ म्हटले आहे. आणि मुक्त कंठाने नामाचे मोठेपण गायिले.

  • ‘नाचूं किर्तनाचे रंगी l ज्ञानदीप लावूं जगीl’ हा संकल्प करणारे संत नामदेव लोकजागृतीसाठी कीर्तनाच्या माध्यमातून देशभर फिरले. संत नामदेव महाराजांच्या अंगी संहिष्णुता हा गुण महत्त्वाचा होता, असे सांगून तळपे म्हणाले की, कीर्तन म्हणजे नामाचा गजर आणि भक्तीचा जागर आहे. कीर्तनाने भगवतस्वरूप जागवायचे आहे, तर दुसरीकडे माणसामाणसातील दिव्यत्वाला आवाहन करायचं आहे.

नामस्मरणाची अनुभूती येणे आणि ती इतरांना देऊन त्यांचेही जीवन नामस्मरणाने आणि परिवर्तित करणे हे संताचे मोठे कार्य आहे. नामभक्तीची पताका फडकवायला आम्ही आलो आहोत. नाम आणि भक्ती वेगळी नाही. नाम हेच भक्तीचे दृश्य रूप आहे. जीव हा शिवस्वरूपात एकरूप व्हायला नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. असे नामदेव महाराज म्हणतात, असे प्रा. तळपे म्हणाले.

  • लोकोध्दार हा त्यांच्या कीर्तनाचा मूळ हेतू. नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग नाचत असत. त्यांच्या घरातील चौदा लोकं त्यांना साथ देत, असे सांगून तळपे म्हणाले की, नामदेव हे सर्वमान्य संत होते. ज्ञानेश्वरादी भावंडे त्यांच्या घरी उतरत असत. त्यांची प्रथम भेट आळंदीत झाली. नामदेवांच्या घराचे छप्पर पांडुरंगाने साकारले आहे. असे मीराबाई म्हणते. तुलसीदास, कबीर आदी संतानी त्यांचे वर्णन केले आहे. शिखांचे श्रीगुरू नानकदेवजी यांनी एकत्रित केलेल्या व शिखधर्माचे पाचवे गुरू ‘ गुरू अर्जुनदेवजी यांनी संपादित केलेल्या पवित्र ग्रंथ गुरूसाहेबजी मध्ये श्रीनामदेव महाराजांचे 61 अभंग समाविष्ट करून भक्त नामदेव महाराज व त्यांच्या वाणीचा सन्मान केला. त्याला ते नामदेवजीकी गुरूबानी या नावाने ओळखतात.

नामदेवांचे श्रीविठ्ठलावर व विठ्ठलाचे नामदेवावर विलक्षण प्रेम होते. विठ्ठलाला सोडून मला कोठेही जावयाचे नाही. माझ्या नाम्याला सांभाळून घेऊन ये असे श्री पांडुरंगाने तीर्थ यात्रेला निघालेल्या श्री ज्ञानेश्वरांना सांगितले.

जातपात न मानणाऱ्या महाराजांचे कोळयाची जनी, हरिजनाचे चोखोबा, ब्राह्मणाचे परिसा भागवत असे अनेक जातीचे शिष्य होते. संत नामदेव यांनी संपूर्ण भारताची तीर्थयात्रा केली. पंजाबात वीस वर्षे कार्य केले, अशी माहिती तळपे यांनी दिली.

  • सुरेश साखवळकर म्हणाले, “आजचं जग धावतं आहे. सुखाच्या शोधात असलेले जग, संताच्या विचारांची गरज आहे.संताचे विचार आज समाजासाठी तारक आहेत. विश्व शांतीसाठी हे विचार फार उपयोगी आहेत” प्रमुख पाहुणे प्रा दीपक बिचे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विलास भेगडे यांनी केले. संस्थेचा हेतू व उद्देश विषद करून संस्थेच्या सामाजिक कार्याविषयीची माहिती भेगडे यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व संत नामदेव महाराजांच्या अभंगाने झाली. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर व श्रीमती कुसुम वाळुंज यांनी केले. आभार बाळासाहेब शिंदे यांनी मानले. यावेळी नितीन महाराज काकडे, रजनीगंधा खांडगे, माजी उपनगराध्यक्षा रजनी भेगडे,उद्योजक विलास काळोखे तसेच तळेगावकर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.