Talegaon : साहेबांना लोकांच्या मनातून हद्दपार करणे अशक्य -रोहित पवार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसला मावळातून हद्दपार केले असून शरद पवार यांना जिल्ह्यातून हद्दपार करू, या भाजप जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, पवार कुटुंबाचे सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी आज चांगलाच समाचार केला. साहेबांचे स्थान हे लोकांच्या मनात आहे. तेथून साहेबांना हद्दपार करणे अशक्य आहे, असे ते म्हणाले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार तळेगाव दाभाडे येथे आले होते. या दौऱ्यात नगरसेविका वैशाली दाभाडे यांच्या घरी ते काही वेळ थांबले होते. औक्षण करून आणि फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. रोहीत यांनी यावेळी या भागातील समस्या जाणून घेतल्या. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना मार्गदर्शन केले.

  • यावेळी तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश चौधरी, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश काकडे, युवक अध्यक्ष आशिष खांडगे, मावळ मुळशी शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब दाभाडे, नगरसेवक आनंद भेगडे, अरूण माने, विशाल दाभाडे, सचिन भेगडे, सतीश खळदे, समीर दाभाडे, प्रमोद दाभाडे, महेश कदम, निरंजन जहागीरदार, विकास उभे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा ज्योती शिंदे, तळेगाव युवती अध्यक्षा निशा पवार, वडगाव शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्षा ज्योती जाधव आदी रा.काॅग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार म्हणाले, पवार साहेबांच्या बाबतीत बोलत असताना ते लोकांच्या हृदयात आहेत. आमदार म्हणत असतील मावळातून राष्ट्रवादी हद्दपार झाली, पण ते खरं नाही. राष्ट्रवादी मजबूत आहे. मात्र, सत्तेच्या ताकदीने असो वा पैशाच्या ताकदीने असो तुम्हाला वाटत असेल तो त्यांचा अहंकार आहे. पण, तुम्ही विचारही करू शकत नाही, लोकांच्या मनातून पवार साहेबांना काढण्याचा! उलट मेमध्ये कोण हद्दपार होईल ते कळेलच. दर्पोक्ती करणाऱ्यांचा अहंकार हद्दपार झाल्याचे पहायला मिळेल.

  • भाजपा- शिवसेना यांच्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे जाणवते. त्यांच्यात मतभेद आहेत. लोकांना बदल आवश्यक आहे. नवीन आणि तरूण उमेदवार हवा आहे, त्याबाबत उत्सुकता आहे. उत्साह जाणवतो आहे. आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून, कुटुंब म्हणून लोकांपर्यंत पोहोचलो आहे, असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीबाबत विचारले असता ते म्हणाले, ह्याच तालुक्यात नाही तर गटबाजी सगळीकडेच आहे. विचार भिन्नता असते, छोटे-मोठे वाद निवडणुकीत होत असतात. पार्थ यांचे नाव लोकांमधूनच आले आहे. पार्थ संपूर्ण तालुक्यात संपर्क करीत होते. आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांनी सर्वमान्य उमेदवार म्हणून पार्थ यांचे नाव पुढे केले. पार्थ हे सर्वांना एकत्रित करून विश्वासात घेणारे तरूण नेतृत्व आहे. त्यांचा स्वभावही चांगला आहे. युवक आहे गटातटाचे प्रश्न आहेत. तो सक्षमपणे सोडवू शकेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

  • राजकारणात पार्थ अनुभवी नाही, हे खरे असले तरी त्याला ओळखत नाही, या खासदार श्रीरंग बारणे यांच्या वक्तव्यातून त्यांचा अहंकार दिसून येतो, अशी टीका रोहित पवार यांनी केली. अहंकार दाखवून दिला. बारणे हे प्रतिस्पर्धी उमेदवार ओळखू शकत नाही, तर ते सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवणार? असा सवाल त्यांनी केला. आम्ही लोकांबरोबर जाऊन काम करत असतो. आम्ही कामाला प्राधान्य देतो, असे पवार म्हणाले.

याआधी पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता राष्ट्रवादीची होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात विकास झाला. मावळातही एमआयडीसी आपल्या विचारानेच आलेली आहे. युवकांची पिढी मावळात मोठी आहे. आम्हाला नोक-या मिळाव्यात हे स्वप्न होते. ते अपूर्ण राहिले. खासदारांनी, आमदारांनी सर्वांची दिशाभूल केली. त्यांनी काय विकासाचे काम केले, हे तरूणांनी त्यांना विचारावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले. युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पार्थच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.