Talegaon News : बाल कीर्तनकार अवनी परांजपे आणि मधुश्री शेंडे यांनी तळेगावातील भाविकांना केले मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – कै. डॉ. मंगलाताई परांजपे स्मृती पुष्प व कलापिनी विश्वस्त डॉ अनंत परांजपे यांचा वाढदिवस आणि उत्पत्ती एकादशीचे औचित्य साधून कलापिनी आणि विठ्ठल मंदिर संस्थान यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील तुकाराम महाराजांचे कीर्तनची परंपरा असलेल्या प्राचीन विठ्ठल मंदिरात 11 डिसेंबर रोजी अवनी परांजपे आणि मधुश्री शेंडे या बालकीर्तनकारांचे आयोजित करण्यात आले होते.

या कीर्तन सेवेद्वारे अवनी आशुतोष परांजपे हिने परांजपे कुटुंबाचा सांस्कृतिक वारसा सुरू ठेवण्याची ग्वाही दिली आहे.  कीर्तनाला योग्य आवाज, सहज अभिनय आणि कीर्तनासारख्या अवघड कलेत अभ्यासपूर्ण सादरीकरणाबद्दल अवनी आणि मधुश्री दोघींचे भाविकांनी कौतुक आणि अभिनंदन केले

वाचन, वक्तृत्व, पाठांतर, गायन, अभिनय इत्यादी 10 कलांचा संगम कीर्तनात असतो. कीर्तनकाराला या सर्व गुणांची उत्तम जाण असली तरच ते कीर्तन परिपूर्ण होते. स्पष्ट शब्दोच्चार, सुरेल आवाज, चोख पाठांतर, सभाधिटपणा, लयतालाची आणि विषयाची समज व भावपूर्णता हे सर्व गुण दोघींमध्ये असल्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

अवनीची आजी अंजलीताई कऱ्हाडकर, आजोबा अरविंद परांजपे, आत्या शिवानी कऱ्हाडकर आणि वडील आशुतोष परांजपे यांचा यामध्ये मोठा वाटा आहे, तसेच या बालकलाकारांना साथसंगत गोरख कोकाटे आणि कौस्तुभ ओक या ज्येष्ठ वादकांनी केली.

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. सुरेश साखवळकर आणि ह. भ. प. ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी या बाल कलाकारांचे भरभरून कौतुक करून आशीर्वादही दिले. कीर्तन ऐकण्यासाठी तळेगाव मधील सांस्कृतिक क्षेत्रातील जेष्ठ आणि अनुभवी व्यक्ती उपस्थित होत्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.