Talegaon News : तळेगावातील ‘देवमाणूस’ ! किशोर आवारे यांच्याविषयी निराधार जेष्ठाची कृतज्ञ भावना

एमपीसीन्यूज : सहा महिन्यांपासून फुटपाथवर जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्याकडून मोफत औषधोपचार व जेवणाचा आधार मिळाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आवारे यांच्या रूपात तळेगावात देवमाणूस भेटल्याची कृतज्ञ भावना  त्या  निराधार जेष्ठाने व्यक्त केली.

पंढरीनाथ सुतार (रा. सांगिसे ता. मावळ), असे या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे. सुतार हे गेल्या सहा महिन्यांपासून तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील शुभम कॉम्प्लेक्स येथे फुटपाथवर आजारी अवस्थेत जीवन जगत होते. या बाबतची माहिती जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांच्या माध्यमातून समितीचे संस्थापक किशोर आवारे यांना मिळाली.

त्यानंतर आवारे यांनी घटनास्थळी जाऊन सुतार यांनी चौकशी केली. ते सांगिसे (ता. मावळ) येथील रहिवासी असून त्यांना दोन मुले आहेत. त्यातील एका मुलाला अर्धांगवायू झाला, तर दुसरा मुलगा बेरोजगार आहे. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी रस्त्यावर यावे लागल्याची माहिती आवारे यांना समजली.

त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेच अन्न, वस्त्र व निवारा मिळण्याची आशा वाटत नव्हती. शुभम कॉम्प्लेक्स येथे ते फुटपाथवर सहा महिने आजारी अवस्थेत जीवन जगत होते. या दरम्यान त्यांना जनसेवा थाळीचा खूपच आधार मिळाल्याचे सुतार यांनी सांगितले.

मात्र, आजारी असताना औषधोपचार कोण करणार?, रक्ताचे नातेवाईक असून त्यांचे काही खरे नाही, तर माझे काय ?, अशी कैफियत मांडत आपले दुःख कोणाला सांगावे म्हणून सहा महिने आजाराशी लढत असल्याची सुतार यांची व्यथा ऐकून किशोर आवारे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी सुतार यांच्यावर मोफत औषधोपचार केले. त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच यापुढे त्यांना जी मदत करता येईल ती करू, असेही किशोर आवारे यांनी सांगितले.

पंढरीनाथ सुतार म्हणाले, खरचं आज मी किशोर आवारे यांच्यात देव पाहिला. त्यांना माझ्या बाबत माहिती मिळताच त्यांनी माझी दखल घेऊन मोफत औषधोपचार केले. तीन महिने मी जनसेवा थाळी खाण्यासाठी जात होतो. त्यांनी कधी पैसे मागितले नाहीत. तळेगाव दाभाडे शहरात किशोर आवारे यांच्यात देव दिसला. खरच देव माणसात असल्याचा साक्षात्कार झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.