Sangvi : सागर शिंदे खून प्रकरणी अवघ्या दोन तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

एमपीसी न्यूज – एकाच गाडीतून आलेल्या मित्रांनी एका मित्रावर गोळी झाडून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रक्षक चौकात घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासात एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सागर शिंदे (रा. जुनी सांगवी (Sangvi) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. योगेश जगताप असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर शिंदे आणि आरोपी एकाच कारमधून रक्षक चौकात आले. गाडीतच त्यांचा वाद झाला. आरोपींनी पिस्तुलातून सागर यांच्यावर गोळी झाडली. त्यात सागर यांचा मृत्यू झाला. भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर आरोपी गाडीतून खाली उतरले. त्यांनी चौकात जाऊन एका दुचाकीस्वाराला अडवून त्याची दुचाकी घेऊन पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पोलिसांना एक रिकामे काडतूस आढळून आले. पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी अवघ्या दोन तासात योगेश जगताप याला ताब्यात घेतले आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. सागर याच्यावर सन 2013 मध्ये चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सोमनाथ वारे या युवकाचा खून झाला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.