Pimpri: प्रभारी अतिरिक्त आयुक्तांनी भांडार विभागाचे केलेय दुकान – राजू मिसाळ 

तक्रारी असूनही आयुक्त त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी भांडार विभागाचे अक्षरश:  दुकान केले आहे. भांडार विभाग दिवाळखोर मानसाच्या हातामध्ये दिला आहे. त्यांच्याबद्दल असंख्य तक्रारी असतानाही आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांना वारंवार पाठिशी घालत आहेत. त्यांच्यावर कारवाई न केल्यास पुढील मंगळवारी (दि.30) आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा, स्थायी समिती सदस्य राजू मिसाळ यांनी दिला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (मंगळवारी)पार पडली. सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विषयपत्रिकेवर 46 विषय होते. त्यापैकी तीन विषय तहकूब करण्यात आले. तर, एक विषय प्रशासनाने मागे घेतला आहे. 29 कोटी 54 लाख 28 हजार रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली.

राजू मिसाळ म्हणाले, ‘कर्मचा-यांसाठी पुरविण्यात येणा-या पादत्राणे यासाठी महापालिकेने ई-निविदा मागविली होती. ज्या कंपनीकडून पादत्राणे खरेदी केली जाणार आहेत. त्या कंपनीकडे त्याचे मॉडेलच नाही. एका कंपनीला डोळ्यासमोर ठेऊन हा प्रकार सुरु आहे. प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी ही गडबड केली आहे. यापूर्वी मोजे खरेदीत देखील त्यांनी गडबड केली आहे. त्यामुळे जुन्या फाईलींची तपासणी करण्यात यावी. अष्टीकर यांनी भांडार विभागाचे अक्षरश:  दुकान केले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी’.

‘भांडार विभाग दिवाळखोर मानसाच्या हातामध्ये दिला आहे. त्यांच्याकडून भांडार विभागाचा पदभार काढून घेण्याची मागणी वारंवार केली. परंतु, आयुक्त त्याकडे दुर्लक्ष  करतात. महापालिकेत स्थानिक अधिकारी सक्षम असताना प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांना मलईदार विभाग दिले जातात. स्थानिक अधिका-यांवर अन्याय केला जातोय. तत्काळ अष्टीकर यांच्याकडील भांडार विभाग कमी करावा. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर वारंवार अष्टीकर यांना पाठिशी घालत आहेत. का पाठिशी घालत आहेत याचे कारण कळत नाही? असेही मिसाळ म्हणाले.

नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची 29 सप्टेंबर 2018 रोजी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांना नांदेड येथून कार्यमुक्त देखील करण्यात आले आहे. परंतु, त्यांना महापालिकेत येऊ दिले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.