Pimpri News : प्रशासकाची ‘स्थायी समिती’ची बैठक आता होणार दर मंगळवारी

महासभेच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव 5, 20 तारखेला प्रशासकाकडे पाठविता येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत आर्थिक विषयांना मंजुरी देण्यासाठी स्थायी समितीची साप्ताहिक बैठक प्रत्येक आठवड्याच्या दर मंगळवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. महासभेची मान्यता आवश्यक असलेले प्रस्ताव प्रशासकाकडे पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 5 आणि 20 तारखेला दुपारी तीन वाजता बैठक होईल. तर, विशेष समित्यांच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव महिन्याच्या पहिल्या व तिस-या मंगळवारी दुपारी तीन वाजता प्रशासकाकडे पाठविता येणार आहेत. या बैठकांना विभागप्रमुखांनी संबंधित माहितीसह उपस्थित रहावे, असा आदेश अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी काढला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी 13 मार्च रोजी संपला आहे. निवडणूक झाली नसल्याने राज्य शासनाने महापालिकेवर आयुक्त राजेश पाटील यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे स्थायी समिती, महासभेचे सर्व अधिकार प्रशासकाला गेले आहेत. यापूर्वी महापालिकेच्या विविध विभागामार्फत महापालिका सभा, स्थायी समिती, विशेष समित्यांच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेने, आयुक्तांनी अधिकार प्रदान केलेल्या अधिका-यांच्या मान्यतेने नगरसचिव कार्यालयाकडे पाठविण्यात येत होते. परंतु, नगरसेवक नसल्याने महापालिका अधिनियमाखालील सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि सर्व कामे, कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या कार्यपद्धतीनुसार विहित नमुन्यातील प्रस्ताव प्रशासकाकडे सादर करण्याची आवश्यकता नाही.

संबंधित विभागप्रमुखांनी स्थायी समितीच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव दर मंगळवारी, महासभेची मान्यता आवश्यक असलेले प्रस्ताव प्रत्येक महिन्याच्या 5 आणि 20 तारखेला आणि विशेष समित्याच्या मान्यतेसाठीचे विहित नमुन्यातील प्रस्ताव महिन्याच्या पहिल्या व तिस-या मंगळवारी नगरसचिव कार्यालयाकडे मुदतीत पाठवावेत. प्रशासकांकडे वेळोवेळी आयोजित करण्यात येणा-या बैठकांना संबंधित विभागप्रमुखांनी आवश्यक त्या माहितीसह उपस्थित रहावे. नियोजित बैठकी दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यापूर्वीच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी बैठक घेण्यात येणार आहे.

‘या’ नमुन्यात पाठविता येणार विषयपत्र!

प्रशासकाच्या मान्यतेसाठी विषयपत्र कसे पाठवावे याचा नमुनाही तयार करण्यात आला आहे. नगरसचिवांच्या नावाने विषयपत्र पाठवावे. विषयपत्रात फक्त मान्यता घ्यावयाच्या कामाचा संक्षिप्त आशय नमुद करावा. सदर आशयाचा ठरावात समावेश करण्यात येईल. विषयपत्रावर आयुक्तांची अथवा आयुक्तांनी विषयपत्रावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत केलेल्या अधिका-याची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर विषयपत्र नगरसचिव विभागाकडे नेहमीच्या पद्धतीने (हार्ड आणि सॉफ्ट कॉपीसह) पाठवावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.