Talegaon Dabhade : मराठे ज्या लढाया हरले, त्या केवळ फितुरांमुळे – प्रा. डॉ. प्रमोद बोराडे

एमपीसी न्यूज – सहजासहजी कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढाईच करावी लागली आहे. शिवचरित्रही हेच सांगते की युद्धात मागे हटायचे नाही, शरणागती पत्करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या लढाया भावनिक न होता संपूर्ण नियोजन करून केल्यानेच अगदी कमी मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी बलाढ्य शत्रूला पराजित केले आणि मराठे ज्या लढाया हरले, त्या केवळ फितुरांमुळे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी केले.

मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृहात श्रीडोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक रामदास काकडे, जी. एस. टी. उपायुक्त सुनिल काशिद, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संतोष खांडगे, व्याख्याते विवेक गुरव, सोनबा गोपाळे, सुमती निलवे, बाळासाहेब शिंदे, विलास काळोखे, मच्छिंद्र घोजगे, दादासाहेब ऊर्हे , मिलिंद शेलार, सुदाम दाभाडे, शंकर हदिमणी, सुनिल कोल्लम, विलास भेगडे, पांडुरंग पोटे, विल्सेन्ट सालेर, सचिन कोळवणकर, ज्योती नवघणे, सुवर्णा मते, उमाकांत कुलकर्णी, बी.जी.पाटील, दशरथ जांभुळकर, विलास टकले, विल्सेंट सालेर, योगेश शिंदे, युवराज पोटे, भगवान शिंदे, तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कीर्ती गाजवली. शत्रू हातात आला की सोडायचा नाही, असा त्यांचा पवित्रा असायचा. प्लासीच्या लढाईतच भारत स्वतंत्र झाला असता, पण केवळ नेतृत्व अभाव आणि फितुरांमुळे मराठे ती लढाई हरले. होळकरांनी दिल्ली जिंकली होती, पण केवळ मराठ्यांमधील फितुरीमुळे हे शक्य झाले नाही. युद्धाची परंपरा पाहिल्यास फितूर नसते तर आपण जिंकलो असतो. त्यामुळे दैनंदिन जीवनातही आपण फितूर दूर करायला शिकले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतीही लढाई लढताना तयारी केल्याशिवाय पाऊल टाकले नाही. अगदी स्वराज्याची राजधानी ठरवतानाही त्यांनी दहा वर्षे अगोदरपासून तयारी सुरू केल्याचे दिसते. बलाढ्य अफजल खानाला भेटायला जातानाही ते पूर्ण तयारीनिशीच गेले होते. खानाला मारायला त्यांना चार शस्त्रे वापरावी लागली, यातून त्यांचे नियोजन दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांकडे जो विचार होता, तो त्यांच्या कृतीतून समोर यायचा. मोघलांना सळो की पळो करून सोडले होते. मोघलांविरुद्ध साल्हेरची लढाई ही शिवाजी महाराजांच्या काळातील मोठी लढाई होती. या लढाईने शिवचरित्राला वेगळी कलाटणी मिळाल्याचे दिसते. शिवाजी महाराजांनी सुरतेवर तीन वेळा यशस्वी चढाई केली. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासही लढायांचा इतिहास आहे. त्यांनी पोर्तुगीजांना पुरते नामोहरम केले होते. धर्माच्या बाबतीतही ढवळाढवळ चालत नव्हती, असेही डॉ. बोराडे म्हणाले.

दरम्यान, रुद्र बोराडे या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याने 114 किल्ले सर केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्याचा सत्कार करून गौरविण्यात आले. प्रास्ताविक विलास भेगडे यांनी, सूत्रसंचालन कुसुम वाळुंज व लक्ष्मण मखर यांनी, तर शंकर हदिमणी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.