Pune News: मुलाला खोट्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी ‘एसआयटी’मार्फत चौकशीसाठी आईचे गृहमंत्र्यांना साकडे

एमपीसी न्यूज – आपल्या मुलावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला बेकायदेशीरपणे अटक केल्याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी एका आईने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

सुनंदा रमेश हजारे असे या मातेचे नाव आहे. त्यांनी शनिवारी (दि.26) गृहमंत्र्यांना भेटून हे निवेदन दिले. त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक उपस्थित होते. पोलिसांनी ‘अरेस्ट मेमो’ न देता तसेच कुणालाही न कळवता आपल्या मुलाला बेकायदेशीर पद्धतीने अटक केली, असा आरोपी हजारे यांनी केला आहे.

या प्रकरणी सुनंदा हजारे व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी यापूर्वी राज्य मानवाधिकार आयोगाकडे देखील तक्रार नोंदविली आहे.

सुनंदा रमेश हजारे यांचे पुत्र अनिकेत हजारे यांचा क्रशरचा व्यवसाय आहे. अनिकेत यांची व्यवसायिक स्वप्नील बालवडकर यांच्याशी ओळख झाली. स्वप्नील यांनी अनिकेत यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी ग्वाही दिली. त्यानुसार अनिकेत यांनी स्वप्नील यांच्या व्यवसायात साडेपाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सुरूवातीला काही रक्कम परतावा म्हणून दिली, पण त्यानंतर स्वप्नील यांनी गुंतवणुकीची रक्कम व नफा देण्यास नकार दिला, असा आरोप हजारे यांनी निवेदनात केला आहे.

निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, स्वप्नील यांनी पोलिसांना हाताशी धरून अनिकेत यांच्या विरोधात बेकायदेशीर सावकारी नियंत्रण कायद्याअंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 28 डिसेंबर 2021 रोजी अनिकेत हजारे यांना अटक केली. तसेच हजारे कुटुंबीयांना चौकशीच्या नावाखाली पोलीस ठाण्यात आठ तास बसवून ठेवले व अरेरावीच्या भाषेत चौकशी केली. स्वप्नील यांच्याकडे पैसे मागायचे नाहीत अन्यथा तुमच्यावर आणखी गुन्हे दाखल करू आणि मोका लावू, अशी धमकी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने हजारे कुटुंबीयांना दिली.

या प्रकरणात आपल्या मुलाची फसवणूक झाली असून उलट त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी तसेच, पोलीस आयुक्तांनी तोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे. आमची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल केला जावा.’ अशी मागणी सुनंदा हजारे यांनी केली आहे.

‘माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक हे या प्रकरणात आमच्या कुटुंबाला कायदेशीर मार्गदर्शन करीत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत, पण त्यांच्या जीवालाही धोका आहे,’ असे देखील सुनंदा हजारे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.