Purushottam Days Part 3: पुरुषोत्तम डेज भाग 3- ‘मंजम्मा पुराणम्’ नाटकाचा ‘पुरुषोत्तम’मध्ये डंका

एमपीसी न्यूज कला संवाद (श्रीपाद शिंदे) –  महाराष्ट्र कलोपासक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने आतापर्यंत हजारो कलाकार रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला दिले आहेत. कला क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याचे आणि स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक महाविद्यालयांचे संघ जीवापाड मेहनत करतात. स्पर्धेपेक्षा स्पर्धेच्या तयारीचे दिवस म्हणजेच ‘पुरुषोत्तम डेज’ मधून कलाकार घडत जातो. यंदाच्या वर्षी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या चार संघानी ‘एमपीसी न्यूज कला संवाद’ या आमच्या व्यासपीठावर हजेरी लावली आणि ‘पुरुषोत्तम डेज’मधील आठवणींना उजाळा दिला. तिसऱ्या भागात पाहूयात पुरुषोत्तम करंडक विजेत्या पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने (BMCC) सादर केलेल्या ‘मंजम्मा पुराणम्’ या एकांकिकेच्या संघाशी श्रीराम कुंटे यांनी साधलेला संवाद… 

पुरुषोत्तम करंडक विजेती एकांकिका ‘मंजम्मा पुराणम्’ 

एखाद्या समाजाकडे हीनतेने पाहण्याची सवय बाळगलेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालून समाजाची मानसिकता बदलण्याचे इंद्रधनुष्य पेलणे ही कौतुकास्पद तेवढीच जोखमीची बाब आहे. पण हे काम जर ‘नाटक’ या माध्यमातून होणार असेल तर ते आणखी जोखमीचे होते. संगीतप्रधान नाटकांचा काळ हळूहळू मागे पडत असताना संगीत नाटकातून समाजप्रबोधन करणे हे भल्याभल्या व्यावसायिक नटांच्याही पचनी पडणारे नाही. पण बीएमसीसीच्या संघाने पुरुषोत्तम करंडकमध्ये ‘मंजम्मा पुराणम्’ हे नाटक सादर करून हे काम केले आहे.

कर्नाटक राज्यातील जोगती समाजाच्या मंजम्मा यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या नृत्य क्षेत्रातील कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नृत्यासह जोगती समाजातील त्यांचे काम प्रेरणा देणारे आहे. त्यातूनच बीएमसीसीच्या ‘मंजम्मा पुराणम्’ या नाटकाचा जन्म झाला, असे दिग्दर्शक योगश सप्रे सांगतो.

‘एमपीसी न्यूज’ने सुरु केलेल्या ‘एमपीसी न्यूज कला संवाद’च्या दुस-या भागात ‘मंजम्मा पुराणम्’ या नाटकाच्या टीमशी चर्चा करण्यात आली. बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक बसवले असून या नाटकाला पुरुषोत्तम करंडक या मनाच्या नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. हे नाटक संगीत नाटक आहे. मंजम्मा यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. जोगतीण कशी जगते, तिला समाज कोणत्या नजरेने बघतो, जोगतीण किंवा तृतीयपंथीयांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, अशा परिस्थितीत त्यांची मानसिकता काय असते आणि समाजाची मानसिकता कशी बदलणे गरजेचे आहे, हा सगळा प्रवास ‘मंजम्मा पुराणम्’ नाटकात सांगण्यात आला आहे.

दिग्दर्शक आणि सहलेखक योगेश सप्रे सांगतो की, जोगतीणीच्या, तृतीयपंथीयांच्या संवेदना, भावना समजून घ्यायला वेळ लागला. त्या समाजातील व्यक्तींच्या भावना कशा निर्माण होतात, ते समजून घेतलं आणि त्या तशा का आहेत याबाबत अभ्यास न करता त्यांचा समाजाकडून स्वीकार का होत नाही, यावर विचार सुरु केला. महाभारतातील एका कथेशी जोडून नाटकाचे कथानक पुढे जाते.

प्रायोजक

पारंपारिक विषयांना बगल देऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जोगतीण हा विषय मांडताना संगीत असायलाच पाहिजे. त्यातून ‘मंजम्मा पुराणम्’ या नाटकात संगीताचा प्रवेश झाला आणि संगीत हा या नाटकाचा अविभाज्य भाग बनून गेला. मंजम्मा यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी ‘मंजम्मा पुराणम्’च्या संपूर्ण टीमचं तोंडभरून कौतुक केलं. आमची स्पर्धा तिथेच संपली आणि आम्ही पुरुषोत्तमला केवळ सादरीकरण केले. आमच्या कामाची प्रशंसा झाली. लोकांना ते आवडलं आणि या नाटकाला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले, असेही दिग्दर्शक योगेश याने सांगितले.

अनया पेंडसे हिने अंबा शिखंडी हे पात्र केले आहे. अनया पेंडसे आणि संगीत गुगलानी या दोघांनी नाटकाची वेशभूषा देखील केली आहे. वेशभूषेची डिटेलिंग झाल्यानंतर पात्रे खुलली. पात्रांच्या वेशभूषेत तालीम करायला देखील वेगळा अनुभव आला. त्यातूनच बारकावे समजले आणि नाटक आणखी खुललं. कला क्षेत्रात ज्या व्यक्तीचे पात्र करतो आहोत, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू वेशभूषेत यायला हवेत, अशी वेशभूषेची बाजू अनयाने मांडली.

‘मी प्रथमच नाटकात काम केलं, तेही पुरुषोत्तमसारख्या मोठ्या स्पर्धत. या नाटकाच्या प्रवासात सांघिक भावना शिकलो. मी हिंदी भाषिक असताना देखील मला नाटकात सहभागी करून घेतलं आणि प्रत्येकाने माझ्यासोबत हिंदीतून संवाद साधला. मग मी देखील मराठी समजून घ्यायला शिकलो’ असे मूळचा नागपूरचा असलेला संगीत गुगलानी सांगतो.

साक्षी पेंडसे हिने ‘मंजम्मा पुराणम्’ या नाटकात गायन आणि संगीत केले आहे. कोरोनाच्या संकटानंतर पुरुषोत्तमची घोषणा झाली. या नाटकात काम करण्याची संधी मिळाल्याने कोरोना काळात आलेलं डिप्रेशन कमी व्हायला मदत झाली. ‘मंजम्मा पुराणम्’ या नाटकाचे संगीत करताना खूप बारीक विचार करावा लागला. भारुडासारखे लोकसंगीताचे प्रकार देखील यात वापरले आहेत. जिथे ज्या प्रकारच्या संगीताची आवश्यकता आहे, ते वापरण्याचा प्रयत्न केला असल्याचे साक्षी सांगते.

हिमांशू बोरकर, कार्तिक किनगे, अमित नवले यांनी नेपथ्य केलं आहे. ‘नाटकाने जगाकडे बघण्याची दृष्टी दिली’ असे हिमांशू बोरकर ‘एमपीसी न्यूज’च्या कला संवादात बोलताना म्हणाला.

शंतनू जोशी याने ‘मंजम्मा पुराणम्’ या नाटकात प्रमुख भूमिका केली आहे. तसेच त्याने नाटकाचे दिग्दर्शन आणि सहलेखन देखील केले आहे. मंजम्मा यांची भूमिका शंतनू याने साकारली असून त्याने या भूमिकेला पूर्ण न्याय दिल्याचे नाटक पाहिल्यानंतर लक्षात येते. नाटक हे रसायन माहिती नसताना पहिलाच प्रयोग आणि तोही पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी, हे दडपण आणणारे होते. मात्र सगळ्या बाबी जमवून घेत नाटकाने पुरुषोत्तम करंडक जिंकला, असे शंतनू म्हणतो.

पुणे, मुंबई वगळता इतर ठिकाणी नाटक सादरीकरणासाठी विषयवार निर्बंध येतात. मोठ्या लेखकांनी अगोदर केलेली, लिहिलेली नाटके अनेक ठिकाणी सदर केली जातात. ती सादर व्हावीच, पण नवीन विषयांना देखील प्रेक्षकांनी समजून घेत दाद द्यायला हवी. पुणे, मुंबईनंतर ही नाट्य चळवळ अहमदनगरमार्गे महाराष्ट्रात निघाली आहे. राज्यभरात नवीन विषयांचे प्रयोग होत आहेत, त्याला प्रेक्षक देखील प्रतिसाद देत असल्याचे निरीक्षक शंतनू जोशी याने नोंदवले.

अमेय रुद्र याने लक्ष्मी जोगतीण हे पात्र केले आहे. तर श्रावणी शाळीग्राम हिने व्यवस्थापनाचा भाग सांभाळला आहे. जोगतीण या समाजाबद्दल लोकांनी दया दाखवू नये. तर त्या देखील माणूस आहेत, हे आपण जिथे स्वीकारतो तिथं हे नाटक यशस्वी होतं, असेही ‘मंजम्मा पुराणम्’ या नाटकाच्या टीमने ‘एमपीसी न्यूज’च्या कला संवादात बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.