Maharashtra HSC Result 2021: बारावी निकालासाठी मूल्यमापन फॉर्म्युला ठरला, असा आहे फॉर्म्युला

एमपीसी न्यूज : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचा तिढा अखेर सुटला असून, मंडळाकडून निकालाच्या मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाले आहे. हे सूत्र सीबीएसई मंडळाच्या धोरणावरच अवलंबून आहे.

यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांचा अंतर्भाव असेल.

असमाधानी विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी

जे विद्यार्थी निकालाने असमाधानी असतील त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे,यासाठी महाराष्ट्र आग्रही होता.

त्यानुसार मुलांच्या मूल्यमापनात सुसुत्रूता/एकवाक्यता रहावी म्हणून केंद्रीय मंडळांनी जाहीर केलेल्या धोरणाशी सुसंगत असा धोरण राज्य सरकारने तयार केल असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांचे निकाल अंतिम करण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर मुख्याध्यापकांच्या / प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.

कोरोनाकाळ शिक्षणक्षेत्रासाठी अतिशय अवघड व आव्हानात्मक ठरला. २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना बरीच तडजोड करावी लागली.विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्द-चिकाटीने पालक,गुणवंत शिक्षकांच्या सहकार्याने आपली वाटचाल पुढे सुरूच ठेवली असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.