Pimpri : महापालिका तीन नव्हे दोन डस्टबीन देणार; डस्ट बीन्सची खरेदी सुरु

30 कोटी रुपये खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक सदनिकांसाठी दोन डस्ट बीन (कचरा पेटी) देण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेने डस्ट बीनची खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी 30 कोटी रुपये खर्च येणार आहे. दरम्यान, प्रशासनाने तीन डस्टबीन खरेदी करण्याचे नियोजित केले होते. परंतु, टीकेचा भडीमार झाल्यानंतर दोनच डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 22 लाखांच्या घरात आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे 850 टन कच-याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा दररोज मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. तर, औद्योगिक, व्यापारी मालमत्तांसह निवासी मालमत्तांची संख्या सुमारे सव्वापाच लाख आहे. निवासी घरांमधील कचरा ओला आणि सुका या पद्धतीने विलगीकरण करून गोळा करणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही.

त्यासाठी सन 2015 मध्ये महापालिकेमार्फत 7 लिटर क्षमतेच्या हिरव्या आणि सफेद रंगाच्या बकेटस प्रति कुटूंब दोन याप्रमाणे 4 लाख 65 हजार कुटूंबांना वाटप करण्यात आल्या. मात्र, दोन वर्षापूर्वी वाटप केलेल्या या बकेटस पूर्ण गायब झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे ओला आणि सुका कचरा विलगीकरण धोरण पूर्णपणे फसले आहे.

ओला – सुक्या कच-यासह घरगुती घातक कच-यासाठी शहरातील प्रत्येक कुटुंबाला तीन डस्ट बीन देण्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावित केले होते. हे डबे अनुक्रमे हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाचे असणार होते. त्यासाठी सन 2019-20 च्या अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र, 10 लिटर क्षमतेचे डस्ट बीन प्रति कुटूंब तीन याप्रमाणे सव्वापाच लाख कुटूंबांना वाटण्याकामी 10 कोटींची तरतूद अपुरी पडत असल्याचे सांगत तरतूद वाढविली. घनकचरा व्यवस्थापनासाठी असलेल्या 56 कोटी रुपयांच्या लेखाशीर्षातून 20 कोटी रुपये डस्ट बीन खरेदी करणे या कामावर 14 ऑगस्ट रोजी स्थायी समितीच्या सभेत वळविण्यात आले होती. त्यानंतर त्याला विरोध होऊ लागला. वाढता विरोध पाहता प्रशासनाने एक पाऊल मागे टाकले आहे.

तीन डस्टबीनचा खर्च विचारात घेता. प्रत्येक सदनिकांसाठी दोन या प्रमाणे डस्टबीन खरेदी करण्यास आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार खरेदी प्रक्रिया सुरु आहे. 30 कोटी रुपये खर्च येणार आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पत्राद्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.