Pimpri : हिंगणघाटच्या दुर्देवी घटनेचे राजकारण ही बाब खेदजनक; राष्ट्रवादीची भाजपवर टीका

एमपीसी न्यूज-  राज्यात भाजपची सत्ता असताना तब्बल पाच वर्षे राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री न देणार्‍या आणि संपूर्ण राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची वाट लावणार्‍या भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ याच म्हणीप्रमाणे आहे. सत्ता गेल्याचे दुख: हे लोक अद्यापही पचवू शकलेले नसून ‘हिंगणघाट’ येथे घडलेल्या दुर्देवी घटनेचे भाजपने चालविलेले राजकारण हे खेदजनक असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यस्था तसेच शेतकर्‍यांची कर्जमाफी न करता फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.23) आकुर्डी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे संजोग वाघेरे यांनी टीका केली.

वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पाच वर्ष भाजपाचे सरकार होते. या सरकारच्या काळात राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला नाही. पाच वर्षांच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यस्थेचे दिवाळे निघाले होते. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपूरचा क्राईमरेट संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक होता. पिंपरी-चिंचवड शहरात आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर 12 हजार गुन्हे घडले. ज्या पक्षाचा आमदार तरुणीवर बलात्कार करतो, तिच्या कुटूंबीयांच्या सदस्यांची हत्या करतो, त्या पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी कायदा सुव्यवस्थेची भाषा करतात हा मोठा विनोदच असल्याचेही वाघेरे यांनी म्हटले आहे.

हिंगणघाटची घटना दुर्देवी असून राज्याचे गृहमंत्री दोनवेळा पीडिताच्या कुटूंबीयांना भेटले आहेत. आरोपीला अटक करून पीडितेला न्याय देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच पीडितेच्या कुटूंबीयांना आवश्यक ती मदत केली जात आहे. मात्र भाजपला या दुर्देवी घटनेवरही आंदोलन करून राजकीय पोळी भाजायची आहे. ही बाब खेदजनक आहे, असेही वाघेरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. जनता भाजपाच्या लोकांची नौटंकी जनता ओळखून असल्यामुळे अशा आंदोलनाचा कोणताही परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवर किंवा जनतेवर होणार नाही, असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.