Talegaon : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर खुनी हल्ला; पतीला अटक

एमपीसी न्यूज – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कोयत्याने खुनी हल्ला केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेसात वाजता सोमाटणे फाटा येथे घडली.

सतीश बंडू गायकवाड (वय 55, रा. मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी रामदास खंडू आरगडे (वय 43, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लीना सतीश गायकवाड असे जखमी पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश हा फिर्यादी रामदास यांच्या सोमाटणे फाटा येथील खोलीत भाड्याने राहत होता. सतीश याने त्यांची पत्नी लीना यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण केली. लोखंडी कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात व इतर ठिकाणी मारून गंभीर जखमी केले. याबाबत घरमालकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.