Pimpri : सहशहर अभियंतापदी पदोन्नतीचा विषय ‘विधी’ने ठेवला तहकूब

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती समितीने सह शहर अभियंतापदी पदोन्नती दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शुक्रवारी) होणा-या विधी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. तथापि, विधी समितीने तो प्रस्ताव तहकूब ठेवला आहे. 

महापालिकेच्या विधी समितीची पाक्षिक बैठक आज (शुक्रवारी) पार पडली. सभापती माधुरी कुलकर्णी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विषयपत्रिकेवर चार विषय होते. त्यापैकी तीन विषय मंजूर करण्यात आले. तर, पदोन्नतीचा विषय तहकूब करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सह शहर अभियंत्याची तीन पदे मंजूर आहेत. स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील आणि विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे हे कार्यरत आहेत. तर, एक पद रिक्त होते. तसेच सह शहर अभियंता अयुब्बखान पठाण सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचे पद देखील रिक्त आहे.

पदोन्नती समितीची 4 सप्टेंबर 2018 रोजी बैठक झाली. या बैठकीत कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी विधी समितीसमोर ठेवण्यात आला होता. तथापि, विधी समितीने तो विषय तहकूब ठेवला आहे.

याबाबत बोलताना सभापती माधुरी कुलकर्णी म्हणाल्या, ‘सह शहर अभियंतापदी बढती कशी दिली आहे. आरक्षण आहे का? याची सविस्तर माहिती प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे हा विषय तहकूब ठेवण्यात आला आहे. प्रशासनाला सविस्तर माहिती मागविली असून त्यानंतरच हा विषय मंजूर करण्यात येणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.