Pimpri : कामगार कल्याण मंडळाचे भूखंड द्या नाहीतर मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण

एमपीसी  न्यूज  –  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यामध्ये १९९२ साली झालेल्या करारानुसार अण्णासाहेब मगर स्टेडियम ही कामगार कल्याण मंडळाच्या मालकीची सुसज्ज वास्तू पिंपरी-चिंचवड महापालिकेला हस्तांतरित केली आहे. त्या मोबदल्यात महापालिकेने काही रक्कम व चार भूखंड कामगार कल्याण मंडळास देण्यात येणार होते. कामगार कल्याण मंडळाचे भूखंड द्या नाहीतर मगर स्टेडियमचा ताबा घेऊ, असा इशारा महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी दिला आहे. 

यावेळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे, कार्याध्यक्ष मुकुंद वाखारे, रामकृष्ण राणे, मोहन गायकवाड, पंकज पाटील, माणिनी फौंडेशनच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

या करारानुसार वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर २००५ मध्ये कामगार कल्याण मंडळाकडील आण्णासाहेब मगर स्टेडियमची २८ एकर जागा सर्व सोयी सुविधांसह मनपाला हस्तांतरित करुन पाच कोटी रुपये आणि मनपा परिसरात पाच भूखंड देण्याचा ठरावात (क्रमांक २२२८ अन्वये) मान्यता देण्यात आली. त्यापैकी मंडळास आतापर्यंत फक्त एक कोटी रुपये आणि सर्व्हे नंबर १९५ चिंचवड येथे सुमारे २०००० चौ. फूट जागा मिळाली आहे. करारामध्ये नमूद केलेली उर्वरित रक्कम सुमारे रुपये चार कोटी मागील पंचवीस वर्षांच्या व्याजासह मिळावेत तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राधिकरणाकडून दोन भूखंड ताब्यात घेऊन कामगार कल्याण मंडळाला देणार होते. त्याबाबतची कार्यवाही महानगरपालिकेने केली असून ते भूखंड त्वरीत मिळावेत अन्यथा संतप्त कामगार आण्णासाहेब मगर स्टेडीयमचा ताबा घेतील.

भारती चव्हाण म्हणाल्या की,  आमच्या मागणीनुसार कार्यवाही न झाल्यास कामगार रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढा उभारुन स्टेडियमच्या ताबा घेतील. २००३ मध्ये पाठपुरावा केल्यानंतर सर्व्हे नंबर ५ मोशी येथे दोन एकर, सेक्टर नंबर २५, प्लॉट क्रमांक २९० येथे २५०००चौ.फुट,  सेक्टर २६ जलतरण तलावाजवळ दोन एकर, थेरगाव सर्व्हे नंबर ९ मध्ये दीड एकर, चिंचवड सर्व्हे नंबर १९५ येथे २०००० चौ.फुट. असे भूखंड देण्याचे ठरले, यापैकी चिंचवड सर्व्हे नंबर १९५ मधील जागा ताब्यात मिळाली आहे. १९९२ पासून २०१८ पर्यंत २६ वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेने कामगार कल्याण मंडळास भूखंड हस्तांतरित केलेले नाहीत. त्यामुळे लाखो कामगारांवर अन्याय झाला आहे.

या प्रकरणाची वेळोवेळी कामगार कल्याण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, कामगार मंत्री, कामगार कल्याण आयुक्त, कामगार कल्याण मंडळ सदस्य, पिंपरी चिंचवड मधील सर्व कामगार नेते, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघ, गुणवंत कामगार, मी स्वतः आणि अनेक कामगार कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. वारंवार सुधारित करार करुनही सर्व कराराचा भंग मनपाने केला आहे, त्यामुळे आता आण्णासाहेब मगर स्टेडियम ही महाराष्ट्रातील कामगारांच्या कष्टाच्या निधीतून उभी राहिलेली हक्काची वास्तू त्वरित कामगार कल्याण मंडळास विना विलंब परत करावी अशी आमची मागणी आहे.

कामगारांचा संयम आता संपला असून कामगार रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढा उभारुन स्टेडियमच्या ताबा घेतील, असा इशारा कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी दिला. तसेच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्राला पिंपरी चिंचवड महापालिका व महाराष्ट्र शासन जबाबदार असेल.

वास्तविक पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी असून लाखो कामगार कुटुंबीयांचे वास्तव्य येथे आहे. कामगार नगरी म्हणून उदयास आलेल्या या परिसरातील लाखो कामगारांनी आजपर्यंत अनेक वर्षे कामगार कल्याण मंडळाला स्वत:च्या कष्टातून कोट्यवधी रुपयांचा निधी उभारलेला आहे. हा निधी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या, विद्यार्थ्यांच्या, महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरला जातो; परंतु मनपाने अद्यापपर्यंत भूखंड हस्तांतरित न केल्यामुळे कामगार कल्याण मंडळा मार्फत उभारण्यात येणारे कोणतेही प्रकल्प पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले गेले नाही. पर्यायाने कामगार आणि कामगार कुटुंबीय या सोयी सुविधां पासुन वंचित राहीले, हे लाखो कामगारांचे भरुन न निघणारे नुकसान आहे.

कामगारांच्या मतांवर पिंपरी-चिंचवडमधील राज्य कार्यकर्ते कारभार करतात. आणि कामगारांच्या हितावर घाला घालून एवढा मोठा अन्याय मनपा आणि महाराष्ट्र शासन पर्यायाने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य का करतात या बाबतचा जाहीर खुलासा करुन अण्णासाहेब मगर स्टेडियम त्वरित कामगार कल्याण मंडळाचे ताब्यात देण्यात यावेत, किंवा करारामध्ये नमूद केलेली उर्वरित रक्कम सुमारे रुपये चार कोटी मागील पंचवीस वर्षांच्या व्याजासह मिळावी, कारण हा पैसा कामगारांच्या कष्टाचा आणि घामाचा आहे. तसेच चार भूखंड त्वरित ताब्यात देण्यात यावेत, असे न झाल्यास कामगार योग्य वेळी आपल्या अधिकाराचा वापर करून राज्यकर्त्यांना घरी बसल्या शिवाय राहणार नाहीत याची कृपया दखल घ्यावी.

महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक यासारख्या ठिकाणी कामगार कल्याण मंडळाने भव्य प्रकल्प उभारले असून त्यामध्ये ट्रेनिंग सेंटर, इंडोअर-आउटडोअर गेम्स,सेमिनार हा़ँल, अद्ययावत लायब्ररी, वसतिगृह, स्विमिंग पूल, मनोरंजन केंद्र, महिला व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र,मंँरेज हा़ँल, मंँरेज लाँन,आँडिटोरियम अशा सुसज्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या असून आजपर्यंत महाराष्ट्रातील असंख्य कामगारांनी त्याचा लाभ घेतला आहे. परंतु पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील कामगार मात्र वंचित राहिले आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे गुरव येथे कामगार कल्याण केंद्राला सम्मति  मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांचेही आभार मानले. तसेच सदरचे निवेदन कामगार मंत्री संभाजीराजे निलंगेकर पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही दिले आहे. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून हा कामगारांचा आत्मियतेचा, हक्काचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न  त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी कामगार वर्गाकडून करत आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.