Chinchwad : पोलीस आयुक्तालयाच्या जागेचा तिढा सुटेना

जागांचे प्रस्ताव शासन दरबारी धूळखात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसाठी (Chinchwad) स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन होऊन पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, अद्यापही पोलीस आयुक्तालयाला स्वतःच्या हक्काची स्वतंत्र इमारत मिळालेली नाही. प्रत्येक पोलीस आयुक्तांकडून स्वतंत्र इमारतीच्या जागेसाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र, पाच वर्षे उलटूनही हे प्रस्ताव शासन दरबारात धूळखात पडले आहेत. स्वतःची हक्काची जागा नसल्याने पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सध्या भाड्याच्या इमारतीतून सुरु आहे.

Talegaon : जुना पुणे मुंबई महामार्गावर वडाचे झाड पडले; वाहतूक ठप्प

पुणे शहर आयुक्तालयातील नऊ तर ग्रामीण हद्दीतील पाच पोलीस स्टेशन मिळून 25 मे 2018 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली. 15 ऑगस्ट 2018 रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयुक्तालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली. मात्र, ही जागा अपुरी पडत असल्याने 1 जानेवारी 2019 पासून प्रेमलोक पार्क येथील शाळेची दुमजली इमारत भाड्याने घेण्यात आली. आता ही जागा देखील अपुरी पडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनासह इतर विभागाच्या कार्यालयासाठी जागेची कमतरता भासू लागली आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी चिखली येथील जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठीचा प्रस्तावही गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, तो अद्यापही विविध विभागांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अशीच स्थिती मुख्यालयाची आहे.

मुख्यालय व परेड ग्राऊंडसाठी देहूतील विठ्ठलनगर येथील जागेची मागणी केली आहे. मात्र, त्या जागेसाठी देखील अद्याप मुहूर्त लागलेला नाही. सध्या निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळा येथे मुख्यालय असून, येथे मैदानही पुरेसे नाही. प्रशस्त मैदान नसल्याने भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीसाठी वानवडी येथे जावे लागते. तसेच पोलिसांना परेडसह खेळण्यासाठीही मैदान उपलब्ध नाही.

आयुक्त कार्यालय आणि मुख्यालयही शाळेच्याच इमारतीत सध्या पोलीस आयुक्तालयासाठी चिंचवड प्रेमलोक पार्क येथील सर्व्हे नंबर 165 व 166 मधील महात्मा ज्योतिबा फुले शाळेची (इंग्लिश मीडियम स्कूल) इमारत भाड्याने घेतली. या शाळेच्या भूखंडाचे क्षेत्रफळ चार हजार 427.50 चौरस मीटर आहे. इमारत बांधकाम क्षेत्रफळ दोन हजार 205.13 चौरस मीटर आहे.

ही जागा 6 जानेवारी 2018 रोजी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. तसेच सध्याचे पोलीस मुख्यालय निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळेच्या इमारतीत आहे. या इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ 676.17 चौरस मीटर असून मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ तीन हजार 118.34 चौरस मीटर आहे.

आयुक्तालयासाठी चिखली तर मुख्यालयासाठी देहूच्या जागेची मागणी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चिखली गट क्रमांक 539 येथे 3.39 हेक्टर जागेची मागणी केली असून, तसा प्रस्तावही पाठवला आहे. याबाबत नगर विकास विभागाने पीएमआरडीए कडून अभिप्राय मागवला आहे. ही प्रक्रिया पार पडल्यास या जागेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. तर पोलीस मुख्यालयासाठी देहूतील विठ्ठलनगर येथील गट क्रमांक 97 येथील 20 हेक्टर जागेची मागणी केली असून, प्रस्तावही पाठवला आहे. या जागेचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.