Pimpri Chinchwad : पोलीस आयुक्तालयाला पाच वर्ष पूर्ण

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पाचवा वर्धापन दिन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होऊन (Pimpri Chinchwad) पाच वर्ष उलटली. या पाच वर्षात पाच पोलीस आयुक्त शहराला मिळाले. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला. पण ऐकतील ते गुन्हेगार कसले. लहान, मोठे गुन्हे सुरूच आहेत. ती न संपणारी प्रक्रिया आहे. याच काळात पोलिसांच्या सक्षमीकरणावर आणि आयुक्तालयाच्या मुलभूत बाबींकडे देखील लक्ष दिले गेले. तरीही अजून काही अडचणी जैसे थे आहेत. आयुक्तालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयुक्तालयाच्या आजवरच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा….

(पोलीस आयुक्त कार्यालय)

तत्कालीन भाजप सरकारच्या अजेंड्यावरील एक काम म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय.  शहरातील औद्योगीकरण, शैक्षणिक संस्था, आयटी इंडस्ट्री, शहर परिसरातील जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि त्या अनुषंगाने वाढती गुन्हेगारी या सर्वांसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असायला हवी, अशी (Pimpri Chinchwad) मागणी झाली.

 (पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन)

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मे 2018 मध्ये आयुक्तालयासाठी मंजुरी मिळाली. त्यानंतर प्रशासकीय बाबींची जुळवाजुळव करून 15 ऑगस्ट 2018 पासून आयुक्तालय सुरु झाले. पहिले पोलीस आयुक्त म्हणून आर के पद्मनाभन शहरात आले.

                                                          (दुसरे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई)                         

आजवर पुणे पोलीस आयुक्तांकडून शहर सुरक्षेचा गाडा हाकला जात असे. मात्र आता शहरासाठी स्वतंत्र आयुक्त आणि त्यांची संपूर्ण स्वतंत्र यंत्रणा आली. सुरुवातीला पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी तर पुणे ग्रामीण मधील देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, आळंदी, चाकण पोलीस स्टेशन पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यात आले. कालांतराने पाच वर्षात चिखली, शिरगाव, महाळुंगे एमआयडीसी, रावेत हे पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आले.

                                                               (तिसरे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश)

 

आयुक्तालयासाठी चार हजार 840 एवढे मनुष्यबळ मंजूर झाले. मात्र पुणे शहर आणि ग्रामीण मधून केवळ 2 हजार 191 एवढे मनुष्यबळ मिळाले. तोकड्या मनुष्यबळावर कुठलीही संसाधने नसताना आयुक्तालयाचा कारभार (Pimpri Chinchwad) सुरु झाला. ऑटो क्लस्टर येथील भाड्याच्या इमारतीत पोलीस आयुक्त बसू लागले. त्यानंतर महापालिकेच्या चिंचवड येथील एका शाळेचे स्थलांतर करून ती शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी दिली. आयुक्त कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळाली, मात्र अद्यापही ती भाड्याचीच आहे.

                                                                  (चौथे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे)

पोलीस आयुक्त कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात असावे म्हणून त्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयासाठी जागेचा शोध पाच वर्षांपासून सुरूच आहे. पोलीस मुख्यालायासाठी देहूगाव येथील जागा अंतिम करण्यात आली असली तरी तिचा ताबा अद्याप पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळालेला नाही.

(पाचवे आणि सध्याचा पिंपरी चिंचवडचा कारभार ज्यांच्या हाती आहे असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे)

जागाच नाही त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस मुख्यालय, मैदान, शस्त्रागार अजून प्रशस्तपणे तयार झालेले नाही. मैदानाचा अभाव असल्याने पाच वर्षात झालेल्या दोन्ही पोलीस भरतीसाठी इतर घटकांच्या मैदानांवर अवलंबून राहावे लागले आहे. सध्या शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक विभागाची (Pimpri Chinchwad) कार्यालये महापालिकेच्या भाड्याच्या जागेत आहेत. पोलिसांना पोलीस स्टेशनसाठी देखील स्वतःची जागा नाही.

(पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे पदभार दिला)

श्वान पथक, बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) अशा पथकांची गरज आहे. सायबर सेल सुरु झाले असले तरी आवश्यक संसाधने आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. सायबर पोलीस स्टेशन पाच वर्षांनंतरही प्रलंबित आहे. पोलिसांसाठी स्वतंत्र दवाखाना होणे गरजेचे आहे. पोलिसांसाठी वाहने, वाहन चालक, पेट्रोल पंप, पोलीस अधिकारी, कर्मचारी अशी आवश्यक बाबींची भलीमोठी यादी पाच वर्षानंतरही शिल्लकच आहे.

(पोलीस आयुक्तालयाचा सुरुवातीला सर्व कारभार ऑटो क्लस्टर येथील या इमारतीमधून चालत असे)

पाच वर्षात सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस उपायुक्त पदांना मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यातील भरती सन 2019 साली झाली. करोना साथीमुळे ही भरती पुढे गेली. डिसेंबर 2021 मध्ये पहिल्या टप्प्यातील भरती पूर्ण होऊन पात्र उमेदवार प्रशिक्षणासाठी गेले.

त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरती जाहीर करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 166 पदे मंजूर झाली होती. पहिल्या टप्प्यात 720 पैकी 50 उमेदवार परीक्षा घोटाळ्यात अपात्र झाले. ती पदसंख्या दुसऱ्या टप्प्यात अधिकची मंजूर होऊन दुसरा टप्पा 216 पदांचा जाहीर झाला.

                                (पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले झेंडा वंदन,15 ऑगस्ट 2018)

शहर पोलीस दलात वाहन चालक पदांची कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी आयुक्तांनी नामी युक्ती केली. जिल्हा बदलून येणाऱ्या पोलिसांना काही दिवस वाहन चालक म्हणून काम करावे लागेल, या अटीवर त्यांना घेण्यात आले. शहर पोलिसांकडे 60 वाहन चालक त्यातून तयार झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील भरतीत आणखी वाहन चालकांची पदे मंजूर करून भरली जाणार आहेत.

(विद्यमान पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे माजी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार दिला)

गेल्या पाच वर्षात बलस्नेही पोलीस कक्ष ही संकल्पना आयुक्तालयात राबविण्यात आली. बालकांसाठी पोलीस स्टेशन आणि तिथले कामकाज दडपण आणणारे नसावे यासाठी अशा कक्षांची स्थापना करण्यात आली. यातून गुन्हेगारीकडे वळण्याच्या टप्प्यात असलेल्या बालकांचे समुपदेशन केले जाते. बालकांची शक्ती विधायक कामात लागण्यासाठी खेळांमध्ये त्यांचा सहभाग वाढवला. हाताला रोजगार मिळण्यासाठी पोलिसांकडून अनेकांना प्रशिक्षण उपलब्ध करून दिले गेले.

त्याच पद्धतीने शहर परिसरातील अनेक गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या रेकोर्डवर आल्या. शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. टोळी युद्ध संपण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.