Pimpri : लाटेवर स्वार झालेल्यांनी आमची उंची मोजण्याचे धाडस करू नये – संजोग वाघेरे पाटील

पढीत श्वानाला आम्ही किंमत देत नाही, भाजपकडून होणाऱ्या वक्तव्यास प्रतिउत्तर

एमपीसी न्यूज -राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर केलेली टीका मोदी लाटेवर स्वार होऊन केवळ अपघाताने महापालिकेत निवडून आलेल्या एकनाथ पवार यांना झोंबण्याचे कारण नव्हते. एकदा नव्हे सहावेळा स्वतःसह इतरांनाही निवडून आणण्याची कामगिरी आम्ही करून दाखविलेली आहे. आमची उंची मोजण्याचे धाडसही त्यांनी करू नये. ज्यांना मोदीलाटेतही विधानसभेला निवडून येता आले नाही, त्या कर्तृत्वशून्य व्यक्तींनी आमची उंची कशी मोजावी? खरे तर आम्ही अशा पढीत श्वानाच्या भुंकण्याला किंमतही देत नाही. स्वतःच्या पक्षात ज्यांना काडीची किंमत नाही, त्यांनी आमच्या पक्षनिष्ठेची चिंता करू नये. कोणीतरी सांगितले म्हणून वक्तव्य करणार्‍यास आम्ही उत्तरे देण्याची गरजच नाही, असे प्रतिउत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिले.

प्रश्न एवढाच आहे की, ऊठल्या बसल्या अजितदादांना अटक करण्याची वल्गना करणार्‍या दानवेंनी आता तरी लोकांना उल्लू बनवू नये. साडेचार वर्षे झाली तरी ते अजितदादांवर कारवाईच्या केवळ वल्गना करीत आहेत. अजितदादा जर दोषी असते तर एवढया वर्षांत भाजपने कारवाईची हिंमत का दाखविली नाही? एकहाती सत्ता असूनही राज्यातील जनतेचे कोणतेही प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपाला आता जनतेसमोर कसे जायचे हाच मोठा प्रश्न आहे.

त्यामूळे हैराण झालेले काही पढीत श्वान पत्रकबाजीचा उद्योग करीत आहेत. त्यापेक्षा त्यांनी शहरातील पाण्याचा प्रश्न, कचर्‍याचा प्रश्न, वाहतूकीचा प्रश्न यांकडे लक्ष द्यावे. लाटा पुन्हा पुन्हा येत नसतात, कर्तृत्व सिध्द करावे लागते, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.