Tokyo Olympic 2021 ः खुशखबर, कुस्तीमध्ये भारताला रौप्यपदक

एमपीसी न्यूज – टोकीयो ऑलम्पिकमध्ये कुस्तीच्या आखाड्यात पुरुष गटात भारताचा पैलवान रवीकुमार दहियाने 57 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळविले आहे.

अंतिम फेरीत दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या रशियाच्या जावूर युग्युयेव्हने त्याच्यावर 7-4 गुणांनी मात केली. त्यांनी खेळाचे झुंझार प्रदर्शन केले. ऑलम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता दोन रौप्य व तीन कास्य पदके जमा झाली आहेत.

रवीकुमारने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत रवीकुमारचा रशियाच्या जावूर युग्युयेव्हशी सामना होता.

या पूर्वी या दोघा कुस्तीपटूंचा सामना 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये झाला होता. त्या सामन्यात रशियन पैलवानाने भारतीय कुस्तीपटूला चुरशीच्या सामन्यात 6-4 ने पराभव केला होता.

या स्पर्धेत रवीकुमारला कास्यपदक मिळाले होते. त्याने 2020 आणि 2021 आशियाई चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.