Pune News : पुणे पालिकेने नवीन प्रस्ताव पाठविल्यास मुख्यमंत्री ऐकतील का? 

एमपीसी न्यूज – राज्य सरकारकडून प्रत्येकवेळी पुणेकरांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. निर्बंधाबाबत पुणे पालिकेने नवीन प्रस्ताव पाठविलाच तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आरोग्यमंत्र्यांचे नक्की ऐकतील का? पुणेकरांना न्याय देतील का? असा सवाल सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपस्थित केला.

पुणे महापालिकेने सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला तर मुख्यमंत्री पुण्याला करोनाच्या निर्बंधांतून दिलासा देऊ शकतात, असे व्यक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. यावर महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी काही प्रश्न उपस्थित करत त्याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने काही जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला आहे. 25 जिल्ह्यांना निर्बंधातून सवलत देण्यात आली. 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध तसेच ठेवण्यात आले आहेत. यात पुणे शहराचा समावेश आहे. निर्बंध उठविण्यात न आल्याने शहरातील व्यापारीवर्ग आक्रमक झाला असून गुन्हे दाखल झाले तरी दुकाने सुरू ठेवण्याची भूमिका व्यापारी संघटनेने घेतली आहे. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारचा मुंबईसाठी एक न्याय आणि पुण्यासाठी दुसरा न्याय? असे का असा सवाल उपस्थित करत सभागृह नेते बिडकर यांनी राज्य सरकारच्या धोरणावर कडक शब्दात टीका केली होती. पुणे महापालिकेने सुधारित प्रस्ताव पाठविल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंधातून दिलासा देऊ शकतात, अशी भूमिका आरोग्यमंत्री टोपे यांनी घेतली आहे.

आरोग्यमंत्री टोपे यांनी घेतलेले भूमिकेबद्दल सभागृह नेते बिडकर यांनी ‘ट्विटर’ च्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करत त्याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे. मुंबईला ‘खास’ सवलत देताना असा प्रस्ताव महापालिकेकडून मागविण्यात आला होता का? राज्य सरकार प्रत्येकवेळी पुणे महापालिकेला सापत्न वागणूक का देते? प्रस्ताव पाठवायचा म्हणजे आम्ही आमच्या न्यायासाठी ‘अर्ज’ करायचा का? असे अनेक प्रश्न बिडकर यांनी उपस्थित केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.