अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय ! (भाग 1)

एमपीसी न्यूज- युथ हॉस्टेल असोसिएशनतर्फे आठवडाभराचा मेघालयचा ट्रेक जाहीर झाल्याचे मला हिने सांगितले. यापूर्वी 2014 मध्ये आम्ही मनालीचा तीन दिवसाचा ट्रेक केला होता. युथ होस्टेलतर्फे होणारी व्यवस्था अतिशय उत्तम असल्यामुळे आम्ही दोघांनी या ट्रेकला जाण्याचे निश्चित केले.

मेघालय हे आपल्या पुणे जिह्याच्या आकाराएवढे राज्य. पण या राज्यामध्ये निसर्ग सौंदर्याचा अनुपम खजिना लपलेला आहे. हा खजिना चालत -चालत अनुभवणे म्हणजे आमच्यासाठी अनोखी संधी होती. मग आपल्याबरोबर आणखी कुणाला घेऊन जायचे त्याचा विचार करून चाचपणी सुरु केली. माझ्या बंगळुरूच्या मित्राला शरथ राव याला फोन केला. त्याला सांगताच त्याने दुसऱ्या क्षणाला माझ्या खात्यावर पैसे देखील ट्रान्सफर केले. पावनखिंड ट्रेकमध्ये ओळख झालेले सतीश पवार ते देखील लगेच तयार झाले. सतीश पवार म्हणजे उत्साही व्यक्तिमत्व. पोलीस खात्यामध्ये राहून देखील आपली भटकंतीची हौस टिकवून आहेत. आश्चर्य म्हणजे शुगर डिटेक्ट झाल्यानंतरही पट्ठ्यानी हिमालयामधील ट्रेक पूर्ण केले आहेत. आमचा ट्रेक ऐन दिवाळीच्या दिवशी असल्यामुळे इच्छा असून देखील काहीजण येऊ शकले नाहीत. होता होता आम्ही बारा जण तयार झालो.  पण नंतर ऐनवेळी तीन जणांचे रद्द होऊन आम्ही आठ जण प्रवासाला निघालो

प्रवासाची तयारी करण्यासाठी व्हाट्स अँप वरून युथ हॉस्टेलकडून मार्गदर्शन होत होते. त्याप्रमाणे लक्षात येईल तशा एकेक वस्तू बॅगमध्ये जाऊ लागल्या. 7 नोव्हेंबरला पुण्याहून गुवाहाटीला पहाटे 5 वाजताचे विमान होते. मध्ये कलकत्त्याला साडेतीन तासाचा हॉल्ट होता. माझा पहिलाच विमानप्रवास असल्यामुळे विमानतळावर पोचल्यानंतर माझी अवस्था येरा गबाळ्याची झाली होती. दोन-तीन ठिकाणी आमच्या सामानाची अंगावरच्या वस्तूंची तपासणी झाली. कवायतीसारखे आडवे हात करून त्या ‘सुरक्षा जांचकर्मी’ समोर उभा राहिलो. त्याने हातातील यंत्र माझ्या शरीराभोवती फिरवले. हे म्हणजे डास मारण्यासाठी असणारी रॅकेट आपण आपल्या शरीराभोवती फिरवतो तसा. अखेर त्याचे समाधान झाले असावे. त्याने ‘गो’ म्हटले, मी काढून ठेवलेल्या सर्व वस्तू पुन्हा हॅन्डबॅगमध्ये भरल्या अन विमानाच्या दिशेने चालू लागलो.

विमानाच्या दरवाजात थांबलेल्या हवाई सुंदरीच्या स्मितहास्याचा स्वीकार करीत मी माझी ‘शीट’ शोधू लागलो. पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे ‘मला खिडकीSS’ म्हणून बालहट्ट केला. बायकोने लगेच खिडकीची सीट दिली. तिला त्या सीटमध्ये इंटरेस्ट नव्हता. कारण यापूर्वी तिचा बँकॉक पर्यंतचा प्रवास झालेला होता. मी सीटवर बसून बाहेर पाहिले पण खिडकीसमोर नेमका विमानाचा पंख आलेला. ‘आता काय डोंबल दिसणार बाहेरच ?’ म्हणत गप्प राहिलो. विमानाने टेकऑफ घेतला. पुणे शहराचे लुकलुकणारे दिवे दिसू लागले. काहीवेळाने ते गायब होऊन स्वच्छ हवामानात विमान उडू लागले. मी प्रत्येक क्षण माझ्या कॅमेऱ्यात टिपून घेत होतो. कोलकाता जवळ आले तसे हवामान बदलू लागले. दाट ढगांमधून प्रवास करीत अखेर डमडम विमानतळावर सकाळी साडेआठ वाजता उतरलो. पावसाळी वातावरण होते.

सगळे सोपस्कार पार करून बाहेर आलो. पुढचे विमान दुपारी बारा वाजता असल्यामुळे साडेतीन तास करायचे काय हा देखील प्रश्न होता. भूक लागलेली होती. आता कलकत्त्यामध्ये आलो आहोत तर बंगाली मिठाई खाऊन घ्यावी हा टिपिकल मध्यमवर्गी विचार करून चौकशी केली असता विमानतळावरून एक बस बाजारपेठ भागात जाते. जायला 20 मिनिटे लागतात. हल्दीराम स्टॉप आहे तिथे उतरायचे आणि मनसोक्त खाऊन परत यायचे अशी माहिती मिळाली. ही माहिती देणाऱ्या बंगाली बाबूने आणखी एक माहिती दिली की शेजारीच विमानतळाचे कँटीन आहे. त्याठिकाणी नाश्ता चहा मिळतो. विमानतळाचे कँटीन म्हणजे चकाचक असणारच या कल्पनेने विचारत-विचारत आम्ही ज्या कँटीन समोर पोचलो ते पाहून आम्ही हबकूनच गेलो. अहो, हे ‘कँटीन’ नसून मौजे पिंपरवाडी यस्टी स्टॅण्डवरचे उपाहारगृह वाटत होते. आणि तसल्या त्या ‘कँटिंग’मध्ये ते फ्लाईट पर्सर, त्या नटव्या हवाई सुंदऱ्या नाश्टा करीत होत्या.

त्या ‘कँटिंग’च्या मालकाकडे खाद्यपदार्थांची चौकशी केली असता  इडली, डोसा, पुरी-भाजी, कुर्मा पुरी असली काही नावं सांगून तो पुन्हा आपल्या कामात मग्न. मग धाडस करून इडली चटणी मागितली. इडली म्हणजे जाळी न पडलेली घट्ट इडली आणि चटणी म्हणजे कशाची केली होती हेच कळत नव्हते. खरोखरीच जर एखादा दाक्षिणात्य ग्राहक या ठिकाणी आला असता तर ही  इडली पाहून ‘यंन्ना रास्कला’ असे म्हणत या बंगालीबाबूचे ‘कँटिंग’ उधळून लावले असते.  पुरी भाजी मागितली तर मैद्याच्या चामट झालेल्या पुऱ्या आणि भाजी म्हणजे तिला कायमचा ‘टाटा बायबाय’ केलेला बटाटा. बाकी सगळे ‘उबले हुवे चने’. ना चव ना ढव. बहुतेक पुढचे काही दिवस तुम्हाला हेच खायचंय याची ही पूर्वसूचना असावी. मागितलेल्या डिश कशाबशा संपवल्या आणि हल्दीराम स्टॉपला जाण्याचे निश्चित केले.

पंधरावीस मिनिटात हल्दीरामच्या एका मोठ्या शोरूम समोर पोचलो. दिवाळीचा दिवस असल्यामुळे गर्दी होती. मात्र इथे सुटे पदार्थ विक्रीला नसल्यामुळे समोरच्या फुटपाथवर असलेल्या के सी दास या जुन्या काळातील सुप्रसिद्ध दुकानात शिरलो. मनसोक्त बंगाली मिठाई खाल्ली. आमचे मराठी ऐकून एक बंगाली माणूस चक्क आमच्याशी मराठीमध्ये बोलू लागला. चौकशी करता असे समजले की त्याचे नाव घोष असून तो ३५ वर्षांपासून नवी मुंबईमध्ये राहतो आहे. सुट्टीसाठी कलकत्त्याला आलाय. बंगाली माणसाच्या तोंडून मराठी ऐकून बरे वाटले. आणखी एका गोष्टीची मी नोंद करून घेतली ती म्हणजे वाहतुकीची शिस्त ! कलकत्त्यामध्ये प्रत्येकजण झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबताना दिसला. पादचारी लाल सिग्नल असतानाच रस्ता ओलांडताना दिसले. विनाकारण कुणी हॉर्न वाजवताना, सिग्नल चुकवताना दिसला नाही. पुणेकरांनी याचा जरूर विचार करावा. असो.

पुन्हा आमची स्वारी विमानतळावर परतली. पुन्हा विमानप्रवास पूर्ण करून पावणेदोन वाजता ‘लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ पाऊल टाकले. इथून शिलॉंगला जाण्यासाठी बस, टॅक्सी मिळतात. आम्ही एक इनोव्हा केली आणि शिलॉंगच्या दिशेने निघालो. हा साडेतीन तासाचा प्रवास आहे. रस्ता चौपदरी असल्यामुळे आणि ट्राफिक बेताची असल्यामुळे आमचा प्रवास व्यवस्थित चालू होता. भूक लागल्यामुळे आम्ही हॉटेलच्या शोधात होतो. ड्रॉयव्हरला देखील एखाद्या हॉटेलसमोर गाडी थांबवण्यास सांगितले. पण तास झाला तरी एक चांगले हॉटेल दिसेना. आपल्या इथे कुठल्याही हायवेवर असंख्य ढाबे, हॉटेल, रेस्टोरंट दिसतात. पण तिथे एक हॉटेल दिसायला तयार नाही. फारच भुणभुण लावली म्हणून ड्रायव्हरने एका हॉटेलसमोर गाडी उभी केली. त्या हॉटेलच्या दरवाजातच एक माणूस खुर्ची टाकून बसलेला दिसला. बाकी शांतता दिसत होती. शिवाय ते हॉटेल रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला. त्यामुळे या ठिकाणी काही खायला मिळण्याची शक्यता नव्हती. पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला. पोटात कावळे कोकलत होते. वैतागून सतीश पवार यांनी आपल्या पोलिसी आवाजात ड्रायव्हरला झापायला सुरुवात केली. त्यांचे ते मराठी मिश्रित हिंदी त्या ड्रायव्हरच्या डोक्यावरून जात होते.

‘क्या रे ? हम कितने टाइम से बोलता है होटल देखो करके। एक होटल दिखाया नहीं, दिखाया तो रस्ते के त्या बाजूका……. उस बाजु का ?’ आमची मात्र करमणूक होत होती. अखेर ‘जीवा व्हेज’ या हॉटेलसमोर गाडी उभी केली, आणि आम्ही आपली भूक शांत केली. कधीही या मार्गाने जाण्याचा प्रसंग आल्यास या हॉटेलला जरूर भेट द्या. संध्याकाळचे चार वाजले होते. दिवस मावळतीला चालला होता. याठिकाणी दिवस लवकर मावळतो आणि लवकर उजाडतो. शिलॉँग जवळ आले. या ठिकाणी आपले स्वागत होते ते विस्तीर्ण उमियाम तलावाच्या दर्शनाने. स्वच्छ सुंदर जलाशय आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो. शिलॉंग हे मेघालयची राजधानी. रात्रीच्या वेळचे शिलॉंग पाहत पाहत आम्ही युथ होस्टेलच्या दारात पोचलो.

(क्रमशः) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.