Shirgaon : उत्तेजक इंजेक्शन विक्री प्रकरणी दोघांना अटक

इंजेक्शनच्या 145 कुप्या जप्त

एमपीसी न्यूज – जीममध्ये जास्त वेळ व्यायाम करता यावा तसेच शरीर चांगले दिसावे यासाठी सेवन केले जाणारे उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून 55 ग्राम गांजा आणि इंजेक्शनच्या 145 सीलबंद कुप्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 16) रात्री साडेनऊ वाजता शिरगाव (Shirgaon)येथे करण्यात आली.

Wakad : रात्रीच्या वेळी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

सुमित गणेश पिल्ले (वय 32, रा. चिखली), चैतन्य उमेश कुऱ्हाडे (वय 21, रा. किवळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार समाधान फडतरे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव मधील अभिमान सोसायटी समोर दोघेजण उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी आले असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन सुमित आणि चैतन्य यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 55 ग्राम वजनाचा गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 145 सीलबंद कुप्या जप्त केल्या.

औषध विक्रीचा कोणताही परवाना नसताना आरोपींनी अशी घातक औषधे विक्रीसाठी वापरली. मेफेनटरमाईन सल्फेट हे इंजेक्शन जीममध्ये जाणारे अधिक वेळ व्यायाम करता यावा यासाठी तसेच काहीजण शरीर चांगले दिसण्यासाठी या इंजेक्शनचा वापर करतात. मात्र हे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे जीवावर बेतू शकते.

पोलिसांनी सुमित आणि चैतन्य यांच्याकडून गांजा, मेफेनटरमाईन इंजेक्शन, दोन दुचाकी, एक सुरा, रोख रक्कम असा एकूण एक लाख 21 हजार 350 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.