Hinjwadi : पोलीस ठाण्यातच दोन गटात मारामारी

एमपीसी न्यूज – घराशेजारील जागेच्या वादातून झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यासाठी आलेल्या दोन्ही गटात हिंजवडी पोलिसांसमोर पुन्हा वाद झाल्याने तुंबळ हाणामारी झाली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.  

फौजदार मिलन शंतनु कुरकुटे (वय-31) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रक्माजी वामन पाडाळे, योगेश रक्माजी पाडाळे, निर्मला रक्माजी पाडाळे, किशोर पोपट आवाळे, अंजली किशोर आवाळे, दिगंबर जगन्नाथ पिंगळे, मयुर श्रीकांत पिंगळे, तन्मय दत्तात्रय पाडाळे, कुंदा दत्तात्रय पाडाळे, पुनम दिगंबर पिंगळे, सायली दत्तात्रय पाडाळे (सर्व रा. म्हाळूंगे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दिगंबर पिंगळे व मयुर पिंगळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी म्हांळूगे येथे शेजारी-शेजारी राहण्यास आहेत. त्यांच्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी घराशेजारील जागेवरून वाद झाला. याची तक्रार देण्यासाठी आरोपी हिंजवडी पोलीस ठाण्यात आले होते.

पोलीस ठाण्यातच त्यांचा पुन्हा वाद झाल्याने दोन्ही गटातील आरोपींमध्ये पोलिसांसमोर हाणामारी झाली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल 11 जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी ठाण्याचे फौजदार आर. पी. भवारी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.