Election Result 2022 Analysis: उत्तराखंडमध्ये नेत्यांमधील मतभेदांमुळे काँग्रसेची नाव बुडाली 

एमपीसी न्यूज (राजन वडके) : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पूर्वोत्तर राज्यांमध्ये पूर्वी जनसंघ आणि आताचा भाजप यांना सत्ता मिळणे दुरापास्त होते. मात्र, येथील सत्तेसाठीच्या कासवाच्या स्पर्धेत भाजप आता बाजी मारत असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकीत मणिपूर आणि  उत्तराखंड या राज्यांचाही समावेश होता. या दोन्ही राज्यांत पुन्हा भाजप सत्तेत आला आहे. उत्तराखंडमध्ये एक पक्ष कधीही पुन्हा सलग दुसऱ्यांदा विजयी होत नाही. येथील `अँन्टि इन्कमबेंसिंग फॅक्टर` मोडून काढत भाजपने इतिहास घडवला आहे. मात्र, त्याला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या पराभवाने गालबोट लागले आहे.

एकूण ७० पैकी ४७ जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र, मागील निवडणुकीपेक्षा काही जागा घटल्या आहेत. पूर्वोत्तर राज्यांमधील रस्ते, गरीबी, बेरोजगारी, वैद्यकीय तसेच अन्य नागरी सुविधांच्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या समस्या उत्तराखंडातील नागरिकांनाही भेडसावत आहेत. असुविधांंमुळे पहाडांतील नागरिकांचे पलायन हा येथील अत्यंत गंभीर प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षांत सत्तारूढ भाजपने विकासकामांवर लक्ष देण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे नेते प्रल्हाद जोशी यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून सोपविलेली जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडली. प्रचार यंत्रणा प्रभावी केली. प्रचारात  केंद्राने २०२० पासून सुरू केलेली मोफत धान्य योजना ही `गेम चेंजर` ठरली.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पक्षाच्या प्रत्येक नेता व उमेदवाराने सातत्याने हा मुद्दा मतदारांसमोर मांडला. त्याचा मतदानासाठी चांगला फायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराची झलक पुरेशी ठरली.  काँग्रेसच्या गोटात मात्र सुरुवातीपासून गोंधळाचे वातावरण होते. पक्ष संघटनात्मक दृष्ट्या खूपच कमजोर झाला होता. त्यातच उमेदवार ठरविण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिल्लीत थांबवून ठेवले होते. प्रचाराची अर्धवट तयारी, नियोजनाचा अभाव होता. केंद्राने निवडणूक प्रभारी म्हणून नेमलेले देवेंद्र यादव हतबल ठरले. पक्षाचे नेते प्रीतम सिंह हे त्यांच्या चकराता या पारंपरिक मतदारसंघातून पाचव्यंदा निवडून आले. परंतु, राज्यातील प्रचारात ते कोणताही प्रभाव पाडू शकले नाहीत. काँग्रेसचे स्टार प्रचारक प्रियांका गांधी वद्रा आणि राहुल गांधी यांचा करिश्मा उत्तराखंडातही चालला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील `विकास मंत्रा`त काँग्रेसचे `चार धाम, चार काम` हे अभियान टिकले नाही. राज्यातील नेत्यांमधील मतभेद उत्तराखंडात काँग्रेसची नाव बुडविण्यास  कारणीभूत ठरली. आता पक्षाचे प्रदेश सचिव महेश जोशी यांनी प्रभारी देवेंद्र यादव आणि प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.