Pune News: खराडी-वडगावशेरी परिसरामध्ये साडेतीन एकर परिसरात ऑक्सीजन पार्क विकसित होणार : आमदार सुनील टिंगरे

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्त रविवारी भूमिपूजन

 एमपीसी न्यूज : खराडी आणि वडगावशेरी परिसरातील नागरिकांसाठी साडेसात एकर क्षेत्रामध्ये एक भव्य उद्यान विकसित केले जात आहे. महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमाने २० कोटी रुपये खर्च करून तसेच शहरामध्ये पहिल्यांदा सीईआरएफ (कॉर्पोरेट एन्वायर्मेंट रिस्पांसबिलिटी फंड) चा उपयोग करून ऑक्सीजन पार्क केले जात आहे. या महत्वाच्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ रविवार १३ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार आणि पर्यटन राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.
सुनील टिंगरे यांनी माहिती देताना सांगितले कि खराडी आणि वडगाव शेरी परिसरातील नागरिकांची आपल्या भागात एक मोठे उद्यान असावे अशी गेल्या अनेक वर्षांची इच्छा होती. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या भागात प्रचारासाठी फिरताना येथील नागरिकांनी उद्यान विकसित करण्याची मागणी केली होती. आमदार झाल्यानंतर लगेचच या उद्यानाच्या आश्वासन पूर्तीसाठी पाठपुरावा सुरू करण्यास सुरुवात केली आणि आपल्या या स्वप्नपूर्तीसाठी आता पहिलं पाऊल पडत आहे. वडगाव खराडी येथील सर्वे नंबर ३० येथील साडेसात एकर क्षेत्रावर महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून आपण तब्बल २० कोटी रुपये खर्चाचे ऑक्सीजन पार्क विकसित करत आहोत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पर्यटन राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या प्रयत्नातून हे उद्यान उभे राहत असून त्यांच्याच शुभहस्ते या ऑक्सीजन पार्क उद्यानाचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे.

सर्व वयोगटाचा विचार करून अंतर्गत व्यवस्था
ऑक्सीजन पार्क पुणे शहरातील सर्वात मोठे आणि वैविध्यपूर्ण असे उद्यान ठरणार आहे. या ऑक्सीजन पार्क मध्ये फ्लॉवर गार्डन, क्रोमो थेरेपी गार्डन, फजल गार्डन, लहान मुलांसाठी साहसी खेळ, ज्येष्ठ नागरिकांसाठी सीनियर सिटीजन कट्टा, योगा आणि हास्य क्लबसाठी लॉन, तरूणांसाठी ओपन जिम, एक किमी लांबीचा जॉगिंग व वॉकिंग ट्रॅक, एम्फी थिएटर, सायकल ट्रॅक, पॅगोडा अशा वैविध्यपूर्ण कलाकृती असणार आहेत. संपुर्ण उद्यानात सीसीटीव्ही यंत्रणा एवढेच नाही तर येथे उद्यानाच्या बाहेर हॉकर्स झोन विकसित करणार असून आपल्या भागातील नागरिकांना छोटा-मोठा व्यवसाय करण्याची संधी मिळू शकणार आहे.
विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश
याशिवाय उद्यानात येणार्‍या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र इमारत व्यवस्था करण्यात येणार आहे. या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर पार्कींगची सोय असणार आहे. याशिवाय या इमारतीत एटीएम, एका मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, व्यायामशाळा सुरक्षा रक्षकांची राहण्याची व्यवस्था तसेच इमारतीवर सोलर सिस्टीम उभारण्यात येणार आहे. या इमारतीवर एडव्हारटायझिंग व्यवस्थेच्या माध्यमातून संपूर्ण उद्यानाचा देखभाल दुरुस्तीचा खर्च निघावा यासाठी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे खराडी-वडगाव शेरी हे ऑक्सीसन पार्क उद्यान आपल्या भागाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास वाटतो आहे. असे सुनील टिंगरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.