Vadgaon Crime News : डंपरखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या वीटभट्टी कामगाराचा मृत्यू

एमपीसीन्यूज : किराणा साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडलेला वीटभट्टी कामगार डंपरखाली सापडून गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान गुरुवारी (दि.4) दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.3) रात्री सव्वा नऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील आंबी – मंगरूळ रस्त्यावर गोळेवाडी हद्दीत घडली.

तुकाराम भिकाजी मुकणे (वय 37, रा. गोळेवाडी, ता. मावळ, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या वीटभट्टी कामगाराचे नाव आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम मुकणे हा वीटभट्टीवर काम करत होता. बुधवारी (दि.3) रात्री नऊच्या सुमारास कुटुंबासाठी किराणा साहित्य आणण्यासाठी तो घराबाहेर पडला. आंबी – मंगरूळ रस्त्यावर अज्ञात डंपरखाली सापडून तो गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.

उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णांलयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी (दि.4) दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला.

तुकाराम मुकणे याच्यामागे पत्नी, 6 वर्षांचा मुलगा व 3 वर्ष वयाची मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे या गरीब कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.