Vadgaon Crime News : अखेर ‘त्या’ खुनाचा छडा लागला ; सहा महिन्यांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील आर्डव गावाच्या हद्दीत पवना नदीत एक जानेवारी 2021 रोजी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. तो प्रकार खुनाचा असून त्याचा सहा महिने तपास करून वडगाव मावळ पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आरिफ सिद्धीकी शेख (वय 25, रा.थेरगाव, काळेवाडी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. किशोर दिनकर लोंढे (सध्या रा. काळेवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2021 रोजी मावळ तालुक्यातील आर्डव गावाच्या हद्दीत पवना नदीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मयताची ओळख पटविण्यापासून गुन्ह्याची उकल करण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. सुरुवातीला पोलिसांनी पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांना तपास याद्या पाठवून तपास केला. मात्र कुठेही मयताच्या वर्णनाचे मिसिंग सापडले नाही.

पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशन येथील मिसिंगमधील एक बेपत्ता इसम मयताच्या वर्णनाशी मिळता जुळता होता. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांचे रक्त नमुने घेऊन डीएनए तपासणी केली. परंतु, त्यातही मयताची ओळख पटली नाही. त्यानंतर वडगाव पोलिसांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील 48 पोलीस ठाण्यात खास अंमलदार नेमून पुन्हा एकदा तपास याद्या व मयताचे फोटो पाठवून प्रत्येक पोलीस ठाण्यात मयताचे फोटो लावले.

2 जून रोजी गुलटेकडी, मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये विजय शहाजी चव्हाण नावाच्या चहा विक्रेत्याने मयताचा फोटो ओळखला. तो किशोर दिनकर लोंढे याचा फोटो असून दीड वर्षापासून तो थेरगाव, काळेवाडीमध्ये आपल्या बहिणीकडे राहत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी मयताच्या बहिणीकडे जाऊन मयताच्या वस्तू दाखवून ओळख पटवली.

मयतास गांजा ओढण्याची व दारू पिण्याची सवय होती. तो घरातून न सांगता तीन ते चार महिने कोठेही जायचा. यावेळी देखील कुठेतरी निघून गेल्याचा कुटुंबियांचा समज झाला आणि त्यामुळे त्यांनी मयत किशोर बाबत कोठेही खबर दिली नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

मयत किशोर लोंढे यास गांजा व दारू पिण्याची सवय असल्याने पोलिसांनी त्याची नेहमी बसण्या उठण्याची ठिकाणे व गांजा ओढणाऱ्या मित्रांची नावे निष्पन्न करून थेरगाव काळेवाडी परिसरातील गांजा ओढणा-या मुलांकडे चौकशी केली. त्यातही पोलिसांच्या हाती काही लागले नाही.

दरम्यान, मयताचा मोबाईल क्रमांक निष्पन्न करून पोलिसांनी त्याचा सीडीआर काढला. त्यानुसार तपास करून पोलीस जेलमधून सुटून आलेल्या एका गुन्हेगारपर्यंत पोहोचले. त्याच्या आधारे मयत आणि संशयित आरोपी आरिफ याच्यापर्यंत पोहोचले. आरिफ याला वाकड पोलिसांनी एका विनयभंगाच्या गुन्ह्यात फेब्रुवारी2021 मध्ये अटक केली होती. दरम्यान त्याच्यावर बुलडाणा जिल्ह्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने बुलडाणा पोलिसांनी त्याला वाकड पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. वडगाव पोलिसांनी बुलडाणा पोलिसांशी संपर्क करून आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली.

बुलडाणा पोलिसांच्या तपासात आरोपीने त्याच्या मित्रांसोबत मिळून पुण्यात एक खून केला असल्याचे सांगितले होते. बुलडाणा पोलिसांनी केवळ वाकड पोलिसांशी याबाबत चर्चा केली. मात्र वाकड परिसरात कोणताही मृतदेह आढळला नसल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले. त्यामुळे बुलडाणा पोलिसांनी याबाबत जास्त चौकशी केली नाही. मात्र वडगाव पोलिसांनी वाकड, पुणे मार्गे बुलडाणा गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपीने हा खून का केला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. तसेच आरोपीच्या अन्य साथीदारांचा शोध वडगाव पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.