Vadgaon Crime News : भरधाव कंटेनरच्या धडकेत एक ठार; दोन जखमी

एमपीसीन्यूज : महामार्गालगत उभ्या असलेल्या कार व दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर कारमधील एकजण गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि.8) दुपारी पावणे दोनच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे हद्दीत सत्कार हॉटेल समोर झाला.

बाळू विठ्ठल वंजारे (वय 45, रा.मधूबन सोसायटी, वडगाव मावळ) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सचिन गंगाराम सातकर (वय 37, रा. कान्हे, ता. मावळ), असे अपघातात गंभीर जखमीचे नाव आहे. तर राजू मरीअप्पा कॅम्प (वय 40, रा. मधुबन सोसायटी, वडगाव मावळ) हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन सातकर हा त्यांच्या बंगल्याचे काम सुरु आहे. सातकर हे कारसह (एमएच 14 ईयु 7225) बांधकाम ठेकेदार राजू कॅम्प तसेच दुचाकीवरील बांधकाम मजूर बाळू वंजारेसोबत महामार्गाच्या बाजूला सत्कार हॉटेल समोर कामाच्या पैश्याबाबत बोलत उभे होते.

त्यावेळी पुणे बाजूला जाणाऱ्या भरधाव कंटेनर चालकाने त्यांना जोरात धडक दिली. यात बाळू वंजारे याचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन सातकर गंभीर व राजू कॅम्प किरकोळ जखमी झाले.

पुढील तपास पोलीस हवालदार अजित ननावरे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.