Pune Crime News : जामिनावर सुटून येताच घरफोडी, सराईत चोरटा पुन्हा तुरुंगात

27 ग्राम सोन्याचे दागिने आणि एक चांदीचे बिस्किट जप्त

एमपीसीन्यूज : मोक्काच्या गुन्ह्यात तुरुंगात असणारा सराईत चोरटा जामिनावर सुटून बाहेर आला, परंतु घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक करून पुन्हा तुरुंगात पाठवले. अर्जुनसिंग राजपूतसिंग दुधानी (वय 45) असे या चोरट्याचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी त्याला अटक केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तपास पथकाचे कर्मचारी हे गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी अमित कांबळे व नाणेकर यांना घरफोडी प्रकरणातील एक आरोपी मांजरी खुर्द भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यादरम्यान अशा आरोपीचा शोध घेत असताना एक व्यक्ती पोलिसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपले नाव अर्जुनसिंग राजपूतसिंग दुधानी असल्याचे सांगितले. तसेच अन्य दोन साथीदारांच्या मदतीने त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २७ ग्राम सोन्याचे दागिने आणि एक चांदीचे बिस्किट जप्त केले आहे.

अर्जुनसिंग हा सराईत गुन्हेगार असून 2003 सालापासून त्याच्यावर पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तळेगाव ढमढेरे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.