Pimpri News : …तर संतपीठाला खासगी शिक्षण संस्थेप्रमाणे व्यावसायिक रुप येईल : संजोग वाघेरे

संतपीठातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारू नये

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखलीत उभारण्यात येत असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठात अध्यात्मिक शिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेमार्फत हा वेगळा प्रयोग केला जात असताना खासगी शिक्षण संस्थेप्रमाणे प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क घेणे चुकीचे आहे. महापालिकेच्या या उत्कृष्ट उपक्रमाला खासगी शिक्षण संस्थेप्रमाणे व्यावसायिक रुप येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे संतपीठातील विद्यार्थ्यांकडून 15 हजार रुपये शिक्षण शुल्क आकारणीचे धोरण रद्द करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत आहे. संतपीठ इमारतीचे काम अपूर्ण असताना संतपीठ सुरू करण्याची घाई महापालिका प्रशासन, संतपीठ संचालक मंडळ आणि याचे श्रेय घेऊन पाहणा-या मंडळीकडून सुरू आहे.

संतपीठातील प्रवेश प्रक्रिया 14 जुलै रोजी सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासह संतपीठात शिक्षण घेणा-या पूर्व प्राथमिक वर्गासाठी वार्षिक शिक्षण शुल्क प्रती विद्यार्थी 15 हजार रुपये घेण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त शैक्षणिक साहित्याचा खर्च वेगळा घेतला जाणार आहे.

संत विचाराचा प्रचार प्रसार व्हावा. जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांवर आधारित मुल्याधिष्ठित शिक्षण विद्यार्थ्याना मिळावे, या उद्देशाने महापालिकेमार्फत हा वेगळा प्रयोग आपण करत आहोत.असे असताना खासगी शिक्षण संस्थेप्रमाणे प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क आकारणी व साहित्याचा खर्च घेतला जाणे अयोग्य आहे. ही महत्त्वपूर्ण बाब संतपीठ संचालक मंडळातील सर्व सदस्य, संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि आपण विचारात घ्यावी. त्या प्रमाणे योग्य धोरण राबविणे अभिप्रेत आहे.

अन्यथा महापालिकेच्या या उत्कृष्ट उपक्रमाला खासगी शिक्षण संस्थेप्रमाणे व्यावसायिक रुप येण्यास वेळ लागणार नाही. या गोष्टीचा विचार करून शैक्षणिक शुल्क आकारणीबाबत पुर्नविचार करावा. त्या बरोबर राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही राजकीय दबावाखाली संतपीठ सुरू करण्याची लगीनघाई केली जाणार नाही, याची प्राधान्याने दक्षता घ्यावी; अन्यथा संतपीठाचा मूळ उद्देश बाजुला राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.