Vadgaon Maval : सरसकट सर्व रेशनकार्ड धारकांना धान्य द्यावे : मावळच्या लोकप्रतिनिधींची मागणी

एमपीसी न्यूज :  मावळातील सर्व जनतेला शासनाकडून रेशनकार्डच्या माध्यमातून जीवनावश्यक धान्य वितरण करण्यात येत आहे. मात्र, याचा लाभ फक्त अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशनकार्डधारकांना होत आहे. त्यामुळे उर्वरित कार्डधारकांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. सध्याच्या अतिशय कठीण परिस्थितीत धान्य वाटपात पात्र व अपात्र असा भेदभाव न करता सरसकट सर्व रेशनकार्ड धारकांना धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मावळमधील लोकप्रतिनिधींनी केली आहे.

याबाबत सरपंच बळीराम भोईरकर (भोयरे ), गुलाब गभाले ( वडेश्वर ), राजेश कोकाटे ( माळेगाव ), सुप्रिया मालपोटे ( टाकवे बु ), प्रतिमा शेलार (डाहूली), फसाबाई चिमटे (कुसवली), मनिषा पिचड ( कशाळ), नामदेव गोंटे( सावळा ), विमल निसाळ (खांडी ), शोभा धिंदळे (इंगळूण) आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटनमंत्री नारायण ठाकर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शांताराम लष्करी यांनी मावळचे आमदार सुनील शेळके आणि तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

 

रेशनचे धान्य देताना 26 टक्के रेशनकार्ड धारकांना का नाकारलं जाते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनमंत्री नारायण ठाकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच शासनाने सध्याच्या कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता अंत्योदय योजनेतील व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसह इतरांना सुद्धा काही प्रमाणात अन्नधान्याचे वाटप करावे, अशी मागणी केली आहे.

 

शहरातून आलेल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने क्वारंटाईन व्हावे

 

मुंबई – पुणे परिसरातून आंदर मावळातील आपल्या गावी आलेले नागरिक आमचेच आहेत. परंतु स्वत:च्या व आपल्या समाज बांधवांसाठी त्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे . काही अडचण किंवा त्रास वाटला तर आरोग्य विभाग किंवा प्रशासनाला कळवा. वेळेत उपचार झाले तर कोरोना बरा होतोय हे आपण टिव्हीवर ऐकतोय. त्यामुळे सर्वानी खबरदारी घेऊन शासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मावळमधील लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले आहे.

 

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सुचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मावळ तालुक्यातील अंत्योदय योजनेतील व अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाच अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. सरसकट सर्वांना धान्य वाटप कण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जातो. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर तशी मागणी करावी. मधुसूदन बर्गे – तहसीलदार, मावळ.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.