Pimpri: कोरोना विरोधातील लढ्यासाठी महापालिकेत वॉर रुम; शहरातील 80 ठिकाणचे सीसीटीव्ही उपलब्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य आजाराविरुध्द यशस्वी लढा देण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली आहे. महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याची पाहणी केली.

महानगरपालिकेच्या वतीने कोरोना (COVID-19) वॉर रूम तयार करण्यात आली असून त्यामध्ये पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरातील विविध ठिकाणच्या 80 सीसीटीव्हीचे थेट फुटेज उपलब्ध आहे. याद्वारे संचारबंदीच्या काळात एकत्र होणा-या नागरिकांवर लक्ष्य ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे.

या वॉर रूममध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची माहिती, अहवाल निगेटिव्ह आलेल्या लोकांची संख्या, एकूण रुग्ण संख्या, तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या सॅम्पलची संख्या, होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, रुग्णालयनिहाय रुग्णांची संख्या तसेच कोरोना विषयक सर्व माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध असणार आहे.

गुगल मॅपद्वारे नागरिकांच्या जवळील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्या-या दुकानांची माहिती, घरपोच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या दुकांनांची माहिती, रात्रनिवारा, अन्नछत्र आदींची माहिती महापालिकेच्या मोबाईल अॅपद्वारे देण्याचे काम देखील या वॉर रूममधून करण्यात येणार आहे. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या हालचालींवर या वॉर रूममधून गुगुल मॅपद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सहाय्यक अण्णा बोदडे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सुधीर बोराडे आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.