Vadgaon Maval : संतानी बजावली समाजाच्या आईची भूमिका – धर्मराजमहाराज हांडे

एमपीसी न्यूज- आईच्या चित्ताला नेहमी मुलाचे कल्याण व्हावे असेच वाटत असते. मुलाकडून कोणत्याही प्रकारच्या लाभाची इच्छा आईच्या मनात नसते, तरीही त्याच्यावर विलक्षण प्रेम करते. ज्या मुलाचे ओझे ती नऊ महिने पोटात बाळगते. त्याचा ती सर्वस्वी सांभाळ करते आणि त्याचे कष्ट उपसते. त्याप्रमाणे संतानी समाजाच्या आईची भूमिका बजावल्यामुळे देव, ग्रंथ, सांप्रदाय आणि धर्म समाजाला कळाला आणि त्यामुळेच समाजाचे जीवन सुखी झाले. अशा साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण करताना धर्मराजमहाराज हांडे यांनी ‘आईचे चित्त ‘ समजावून सांगितले.

रविवारी (दि 17) श्री पोटोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोपानराव म्हाळसकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसनराव म्हाळसकर, मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर, अशोकराव म्हाळसकर या म्हाळसकर बंधूंच्या मातोश्री व युवा उद्योजक निलेश म्हाळसकर यांच्या आजी स्वर्गीय सीताबाई बाबुराव म्हाळसकर यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त म्हाळसकर नगर, वडगाव मावळ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी सभापती एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी उपसभापती गणेश अप्पा ढोरे, माजी नगराध्यक्ष अॅड रवींद्र दाभाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भोंगाडे, ज्येष्ठ नेते गणेश भेगडे, पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष रामनाथशेठ वारींगे, हभप नंदकुमार भसे, जि प सदस्य बाबुराव वायकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, नगरसेवक अॅड विजय जाधव, अरूण चव्हाण, खंडूजी तिकोणे, सुभाष बोडके, संतोष कुंभार, सुदाम कदम, पांडुरंग ठाकर, बाळासाहेब जांभुळकर, किरण राक्षे, नामदेव भसे, प्रसाद पिंगळे, नारायण ढोरे, सोमनाथ काळे आणि विशेषत: वारकरी संप्रदायातील प्रवचनकार, कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगमणी, वारकरी आणि मावळ तालुका दिंडी समाजातील सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

लेकूराचे हित l वाहे माऊलीचे चित्त ll ऐसी कळवळयाची जाती l करी लाभाविण प्रीतीं ‘ll पोटी भार वाहे l त्याचे सर्वस्वही साहे l तुका म्हणे माझे l तुम्हा संतावरी ओझे ‘ll या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आईचे महत्त्व सांगताना हांडे महाराज म्हणाले की, त्याग, प्रेम, आणि वात्सल्य म्हणजे आई. आईचे संस्कार लेकरांवर होत असतात. आईनेच संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद अशी तेजस्वी रत्न दिली. तुकाराम महाराजांनी भागवत धर्माचा कळस चढवला, शिवाजी महाराजांनी स्वराजाचे तोरण बांधले तर स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो परिषदेत आपली संस्कृती श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले. समाजाचे आम्ही काहीतरी देणं लागतो म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाचा संसार केला. आईचे अंतःकरण किती महान असते, हे लेकरानं जाणावं म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपल्या आईची सुवर्णातुला केली.

सूत्रसंचालन पोटोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे सचिव अनंता कुडे यांनी केले. यावेळी म्हाळसकर परिवाराकडून सर्व वारकरी, विणेकरी, गायक, मृदंगमणी, टाळकरी यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.