Vadgaon Maval News: सरस्वती व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी दीपक भालेराव यांची निवड

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी दिपक भालेराव यांची, कार्यक्रम प्रमुखपदी संगीताताई ढोरे, कार्याध्यक्षपदी अश्विनीताई बवरे, सचिवपदी अमोल ठोंबरे, खजिनदारपदी योगेश कृ. म्हाळसकर यांची निवड करण्यात आली आहे.

मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

सरस्वती व्याख्यानमालेचे हे 20 वे  वर्ष असून गेली 19 वर्षे नामवंत व्याख्यात्यांचे विचार आणि विविध विषयांद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य वडगांव मावळ परिसरात घडत आहे. प्रतिवर्षी श्रोत्यांचा वाढता प्रतिसाद या व्याख्यानमालेला मिळत आहे.

सरस्वती व्याख्यानमाला ही नागरिकांसाठी प्रतिवर्षी एक आगळीवेगळी पर्वणीच असते त्यामुळे नागरिक देखील या व्याख्यानमालेची आतुरतेने वाट पाहत असतात.

घटस्थापना शनिवार दि. 17 ऑक्टोबर ते शनिवार दि. 24 ऑक्टोबर या नवरात्रीच्या दरम्यान संपन्न होणारी ही व्याख्यानमाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन/ व्हर्च्युअल पध्दतीने संपन्न होणार आहे.

काही भाग्यवान श्रोत्यांना संबंधित वक्त्यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे तसेच व्याख्यानांसोबत इतर काही सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.

नागरिकांना आवडतील आणि ज्यातून संस्कारित समाज घडण्यास मदत होईल अशा व्याख्यानांच्या आयोजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक भालेराव यांनी दिली.

विजयादशमी निमित्त भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन रविवार दि. 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.