Vadgaon Maval: अपघात रोखण्यासाठी एमआयडीसीने त्वरित उपाययोजना कराव्यात – सायली म्हाळसकर

एमपीसी न्यूज – आंबी एमआयडीसी रोडवर असणाऱ्या विशाल लॉन्स मंगल कार्यालयासमोरील चौकात अपघात रोखण्यासाठी एमआयडीसीने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वडगाव मावळच्या मनसे नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांनी केली आहे. 

नगसेविका सायली म्हाळसकर यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली व त्यांना लेखी निवेदनाद्वारे सततचे होणारे अपघात टाळण्यासाठी व आळा बसविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यास सांगितले.

आंबी एमआयडीसी रोडवर असणाऱ्या विशाल लॉन्स मंगल कार्यालयासमोरील चौकात स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे, सूचना फलक व रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग तसेच सिग्नल नसल्याने चौकात वारंवार मोठे अपघात घडत असतात. तसेच या रस्त्याच्या आजूबाजूला मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत असून वडगांव-कातवी, तळेगांव, नऊलाखउंब्रे, आंबी येथील औद्योगिक वसाहतीमुळे कामगार वर्गाची व नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्याचप्रमाणे शेतकरी, शाळकरी विद्यार्थीही जाण्या येण्यास याच पर्यायी रस्त्याचा वापर करत असतात त्यांच्या दृष्टीने हा चौक अत्यंत धोकेदायक व जीवघेणा बनला असून या विषयाची गांभीर्याने दाखल घेऊन होणारे अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे म्हाळसकर म्हणाल्या.

यावेळी वडगाव मनसे नेते मच्छिंद्र मोहीते, विकास साबळे, पल्लवी वारिंगे, साक्षी म्हाळसकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.