Hinjwadi: मालकाच्या समयसूचकतेमुळे चारचाकी पळविणारा चालक गजाआड

हिंजवडी पोलिसांनी अहमदनगरमधून चालकाला पकडले

एमपीसी न्यूज – टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाचा विश्वास संपादन  करुन  म्हाळुंगे येथून चारचाकी वाहन मध्यप्रदेशात घेऊन जात असलेला चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला अहमदनगर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांची तत्परता आणि मालकाच्या समयसूचकतेमुळे दहा लाखांचे नुकसान टळले आहे.

आजमेर कल्लू सिंग (वय 29, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ रा. मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अनिलकुमार भिकू बडदे (वय 58, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी बडदे यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांचे म्हाळुंगे येथे कार्यालय आहे. त्यांच्या कंपनीतील चारचाकी वाहनावर आरोपी सिंग हा चालक होता. त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला होता. गुरुवारी  बडदे यांचे 10 लाखांचे चारचाकी वाहन त्याच्या मूळगावी मध्यप्रदेश येथे घेऊन जात होता. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी सिंग याच्याशी संपर्क साधला. बाहेर आलोय, थोड्या वेळात येतो, असे त्याने बडदे यांना सांगितले; मात्र संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

हिंजवडी पोलिसांनी अहमदनगर येथील एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून आरोपीबाबत माहिती दिली. तेथील पोलिसांनी वाहनांची तपासणी करून आरोपी सिंग याला ताब्यात घेतले. त्यानंतर  बडदे व हिंजवडी पोलिसांचे पथक अहमदनगर येथे गेले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हिंजवडी पोलीस ठाण्यात आणून अटक केली. तसेच त्याच्याकडून चारचाकी वाहन जप्त केले, अशी माहिती हिंजवडी ठाण्याचे फौजदार अनिरुद्ध गिजे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.