Vadgaon Maval News : ‘रेशनिंग कार्यालयाबाहेर फलक नसल्याने नागरिकांची गैरसोय’

रेशनिंग कार्यालयाच्या बाहेर फलक लावावा, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी दिली आहे.

एमपीसी न्यूज – वडगाव येथे पोलीस लॉकअप रूम आणि रेशनिंग कार्यालय शेजारीशेजारी आहे. लॉकअप रूमच्या बाहेर फलक आहे. मात्र, रेशनिंग कार्यालयाच्या बाहेर फलक नाही. त्यामुळे अनेकजण थेट लॉकअप रूमकडे जातात.  त्यामुळे अशिक्षित नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रेशनिंग कार्यालयाच्या बाहेर फलक लावावा, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डोळस म्हणाले की, वडगांव मावळ तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून सर्व सरकारी कार्यालये, दिवाणी न्यायालय,पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, कृषी खाते, दुय्यम निबंधक कार्यालय अशी महत्वाची कार्यालये एकाच ठिकाणी आहेत.  त्यामुळे मावळ तालुक्यातील नागरिक कामासाठी येथे येत असतात.

वडगांव मावळ पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारांना ठेवण्यासाठी असलेली लॉकअप रूम तहसीलदार कार्यालय इमारतीच्या आवारात आहे. या बैठ्या ब्रिटीश कालीन इमारतीच्या आवारात पोलीस लॉक अप रूमच्या बाहेर फलक आहे.

शेजारी रेशनिंगचे कार्यालय आहे. परंतु तेथे कुठलाही तसा फलक नसल्याने रेशनिंगच्या कामासाठी येणाऱ्या अनेक नागरिकांना नक्की कुठे जावं कळत नाही.

निरक्षर, अल्पशिक्षित महिला व वृद्ध हे थेट पोलीस लॉकअप मध्ये जातात. तेव्हा त्यांना शेजारी जाण्यास सांगितले जाते. नामफलकाअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

गेली अनेक वर्षांपासून अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशी नागरिकांची कुचंबणा थांबवण्यासाठी रेशनिंग कार्यालयाच्या बाहेर फलक लावण्याची मागणी डोळस यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.