सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune News : ‘या’ कार्यक्रमासाठी पवार- फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार

एमपीसी न्यूज – कोरोना संकटाच्या काळात पुणेकरांना जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असून सीएसआरच्या माध्यमातून बाणेर येथे सहा मजली कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

जम्बो सेंटरनंतर सर्व सुविधायुक्त दुसरे मोठे कोविड सेंटर पुणे शहरात उभे राहिलेले आहे. या सेंटरच्या सज्जतेचा आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बाणेर येथील कोविड सेंटर पुणे महापालिकेच्या माध्यमातून पंचशील फाऊंडेशन, ABIL फाऊंडेशन, माईडस्पेस बिझनेस पार्क प्रा.लि., मालपाणी गुप संगमनेर, गेरा डेव्हलपमेंट प्रा.लि. यांच्या सहकार्यातून साकारले आहे.

या सेंटरचे शुक्रवारी लोकार्पण होणार असून यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार-आमदार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘या सेंटरमध्ये 270  ऑक्सिजन आणि 44 व्हेंटिलेटर बेड्स असे एकूण 314 बेड्सची व्यवस्था आहे. ऑक्सिजनची कमी पडू नये म्हणून 13  हजार लिटर क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक बसविण्यात आला आहे.

तसेच बॅकअपसाठी 16  बाय 16 ऑक्सिजन सिलिंडर, मॅनिफोल्ड, त्यासाठी शेड तसेच कॉम्प्रेसर व व्हॅक्युम पंप याची व्यवस्था केलेली आहे. वीजेच्या बॅकअपसाठी आयसीयु युपीएस व जनरेटर सुविधा करण्यात आली आहे.

‘सर्व इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. जम्बो सेंटरनंतर हे दुसरे मोठे सेंटर कार्यान्वित झाल्याने शहराला मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे बेड्सच्या उपलब्धतेची आणि पर्यायाने वाढीव बिलांच्या तक्रारीही कमी होणार आहेत.

पूर्ण क्षमतेने हे दोन्ही सेंटर चालवण्याचा प्रयत्न असून बाणेर येथील सेंटरसाठी महापालिकेचा एक पैसाही खर्च झालेला नाही. सहकार्य करणाऱ्या संस्थांचे पुणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक धन्यवाद’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

spot_img
Latest news
Related news