Vadgaon News : वडगाव नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या नगरसेविका अर्चना म्हाळसकर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या नगरसेविका व माजी उपनगराध्यक्षा अर्चना संतोष म्हाळसकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला दोन वर्षानंतर विरोधी पक्षनेता मिळाला आहे. 

वडगाव नगरपंचायतीमध्ये भाजपचे सात नगरसेवक मिळून एक गट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असून काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्षांचा मिळून एक गट व राष्ट्रवादी, मनसे व अपक्ष नगरसेवकांचा मिळून दुसरा गट या दोन गटांची मिळून नगरपंचायतीत सत्ता असल्याने भाजप विरोधी पक्ष ठरला आहे.

भाजपच्या सात नगरसेवकांनी बैठक घेऊन पक्षनेतेपदी अर्चना म्हाळसकर यांची निवड केली. यावेळी गटनेते दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, दशरथ केंगले, सुनीता भिलारे, दीपाली मोरे उपस्थित होते. गटनेते दिनेश ढोरे यांनी विरोधी पक्षनेतेपदी अर्चना म्हाळसकर यांचे नाव सुचवले त्यास नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी अनुमोदन दिले.
त्यानंतर भाजपच्या वतीने नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी विरोधी पक्षनेतेपदी अर्चना म्हाळसकर यांची नियुक्ती झाल्याची घोषणा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.