Vadgaon News : शहरातील स्मशानभूमीची डागडुजी व विद्युतदाहिनीचे रेंगाळलेले काम पूर्ण करण्यासाठी भाजयुमोचे नगरपंचायतीस निवेदन

एमपीसी न्यूज – शहरातील नागरीकांच्या अंत्यसंस्कारासाठी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीची झालेली दुरावस्था सुधारुन तेथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करून विद्युतदाहिनीचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावे, यासाठी नगरपंचायतेने पाठपुरावा सुरू आहे, अशी मागणी वडगाव शहर भाजपा युवा मोर्चाने वडगाव नगरपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पार्थिवाला अग्नी देण्याच्या ठिकाणच्या विटा निघाल्या आहेत तसेच भटक्या कुत्र्यांमुळे विसावा कट्ट्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून स्मशानभूमीची सुव्यवस्था राखण्यासाठी तेथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्त करावा त्याचप्रमाणे विद्युतदाहिनीचे मागील चार वर्षांपासून रेंगाळलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे निवेदनात म्हटले आहे.

वडगाव शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन तळेगाव रोटरी क्लबने वडगाव शहरासाठी विद्युतदाहिनी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मागील ग्रामपंचायतने तसा ठरावही मंजूर करून घेतला होता आणि विद्युतदाहिनीसाठी लागणारी इमारत बांधली परंतु, कालांतराने नगरपंचायत स्थापन झाल्याने विद्युतदाहिनीचा प्रश्न प्रलंबित राहिला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथेही विद्युतदाहिनीची गरज भासू लागल्याने ती गरज ओळखून वडगाव शहर भाजपाकडून विद्युतदाहिनीसाठी आग्रही मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण भिलारे, सरचिटणीस रवींद्र म्हाळसकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष रमेश ढोरे, नगरसेवक दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, शरद मोरे, खंडू भिलारे, अनंता कुडे, भूषण मुथा, राजेंद्र म्हाळसकर, शेखर वहीले, कल्पेश भोंडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.