Wakad : सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे संभाव्य गुन्ह्यांना देखील आळा- पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई

निवडणूकीपूर्वी वाकडमध्ये बसणार एक हजार कॅमेरे

एमपीसी न्यूज- सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे केवळ गुन्हे उघडकीस येतात असे नाही. अनेक गुन्हे सीसी टीव्ही कॅमेरे असल्यामुळे टळतात, असे प्रतिपादन पोलीस आयुक्‍त संदीप बिश्‍णोई यांनी केले. आगामी निवडणूकपूर्वी वाकड परिसरात एक हजार कॅमेरे लावण्यात येणार आहे.

वाकड पोलिसांनी नागरिकांच्या सहकाऱ्याने आपल्या हद्दीमध्ये पाचशे कॅमेरे बसविणार आहेत. या कॅमेऱ्यांचे वितरण बालाजी कॉलेज येथील सभागृहात पोलीस आयुक्‍तांच्या हस्ते शनिवारी (दि. 5) झाले. यावेळी सह आयुक्‍त प्रकाश मुत्याल, उपायुक्‍त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्‍त श्रीकांत मोहिते, पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे, वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आयुक्‍त म्हणाले, “नागरिकांनी दिलेले कॅमेरे हे पोलिसांसाठी उपयोगी तर आहेतच. परंतु नागरिकांनाही त्यामुळे सुरक्षितता मिळणार आहे. ज्याठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहे त्या ठिकाणी “आपण सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात, असा फलक जरूर लिहावा. यामुळे गुन्हे करताना आपण या कॅमेऱ्यात दिसू, असे वाटल्याने गुन्हेगार त्याठिकाणी गुन्हे करण्यास धजावणार नाही. तसेच गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करण्यासाठी तसेच पुरावा म्हणूनही सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजचा फायदा होणार आहे.

प्रस्ताविक करताना उपायुक्‍त ढाकणे म्हणाले, “”सध्या आम्ही लोकसहभागातून पाचशे कॅमेरे बसविणार आहोत. मात्र आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी आणखी पाचशे कॅमेरे बसविणार आहोत.”

पोलीस ठाण्यात लोक सहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना

पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी सर्वच पोलीस ठाण्यात लोक सहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनीही परिसरातील उद्योजक, व्यापारी यांची शुक्रवारी (दि. 4) बैठक घेतली. त्यांना आपल्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी आवाहन केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.